जगभरातून महत्त्वाच्या बातम्या

अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधान शर्यतीतून बाहेर

हिंदुस्थानी वंशाच्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या पंतप्रधान शर्यतीतून आपले नाव मागे घेतले. कॅनडात होणाऱया निवडणुकीसाठी त्यांनी नकार दिला. अनिता आनंद सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी राजीनामा दिल्यानंतर अनिता आनंद त्यांची जागा घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. सध्या जस्टीन टुड्रो नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधान राहतील. 57 वर्षीय अनिता पेशाने वकील आहेत. त्यांनी 2019 मध्ये पहिली संसदीय निवडणूक कॅनडातील ओकव्हिल मतदारसंघातून लढवली होती.

बिग बॉसमध्ये विजेता आधीच ठरतो

सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस-18’ हा टीव्ही शो आता अंतिम  टप्प्यावर आहे.अशातच ‘बिग बॉस सीझन 11’ ची विजेती शिल्पा शिंदेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये शिल्पा शिंदेने शोच्या निर्मात्यांवर प्रेक्षकांना मूर्ख बनवल्याचा आरोप केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शिल्पा शिंदे म्हणतेय, ‘मला माहीत नाही, पण काही लोकांना समजले आहे की निर्माते विजेते ठरवतात. ते स्वतः ते निवडतात, त्यांच्या घरातून उचलतात आणि दाखवतात. आता चॅनलची जी काही रणनीती आहे ती लोकांनाही कळली आहे, त्यामुळेच लोक हा शो जास्त बघत नाहीत. कारण तुम्ही एखाद्याला काही प्रमाणात मूर्ख बनवू शकता.

कार्तिक झाला इंजिनीअर

अभिनेता कार्तिक आर्यन 10 वर्षांनंतर इंजिनीअर झाला. कार्तिकने अभिनयासाठी इंजिनीअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले होते. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शनिवारी कार्तिकला इंजिनीअरिंगची पदवी प्रदान करण्यात आली.

आगीतून प्रीती झिंटा थोडक्यात बचावली

सध्या लॉस एन्जेलिस जगभरात चर्चेत आलंय ते तेथील भीषण अग्निकांडामुळे. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिलादेखील याचा फटका बसलाय. ‘मी आणि माझं कुटुंब सध्या तरी सुरक्षित आहोत’ असे ट्विट प्रीतीने केलंय. अभिनेत्री प्रीती झिंटा अमेरिकेत राहते. प्रीतीने लिहिलंय, ‘माझ्या संपूर्ण कुटुंबाला इथून हलवण्यात आलं असून आम्हाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. धुरकट आकाशातून बर्फासारखी राख खाली पडतेय. वाऱयाचा जोर अजून कमी झाला नाहीये. काय होईल याची भीती आहेच.

दिलजितनंतर आता हनी सिंहचा दौरा

रॅपर हनी सिंह लवकरच दिलजीत दोसांझप्रमाणे देशभर कॉन्सर्ट करणार आहे. पुढील महिन्यापासून त्याचा दौरा सुरू होणार आहे. हनी सिंहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आलीय. त्यानुसार 22 फेब्रुवारीपासून हनी सिंहचा दौरा मुंबईतून सुरू होणार आहे. त्यानंतर लखनऊ, दिल्ली, इंदूर, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदिगड, जयपूर, कोलकाता येथे त्याचे कार्यक्रम होतील. शोची तिकिटे 11 जानेवारीपासून विकली गेली आहेत. तिकिटांच्या वाढत्या मागणीमुळे त्याचे दर वाढवण्यात आले आहेत.

वंदे भारतमध्ये विमानातील टॉयलेट

जम्मूकश्मीर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा एक व्हिडीओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वरून शेअर केला आहे. या व्हीडियोत जम्मू-कश्मीर वंदे भारतच्या फीचर्सबद्दल सांगण्यात आले आहे. या ट्रेनचा वेग उणे 30 डिग्री सेल्सियस तापमानातही कमी होणार नाही. त्याचबरोबर ही वंदे भारत ट्रेन अशी डिझाईन करण्यात आली आहे की त्याच्या काचेवर अजिबात बर्फ साचणार नाही. ट्रेनमध्ये विमानातील टॉयलेटप्रमाणे बायो-व्हॅक्युम टॉयलेट्स असणार आहेत. म्हणजेच त्यात कमी प्रमाणात पाण्याचा वापर होईल.