शारदाश्रमच्या इरा जाधवचे तुफानी त्रिशतक, 157 चेंडूंत ठोकल्या नाबाद 346 धावा

हिंदुस्थानी क्रिकेटला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकरसारखी रत्नं देणाऱया जगद्विख्यात शारदाश्रम विद्यामंदिरच्या 14 वर्षीय इरा जाधवने मेघालयाविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना अवघ्या 157 चेंडूंत 346 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांच्या 19 वर्षांखालील वन डे करंडकात 3 बाद 563 धावांचा डोंगर उभारला. तसेच मुंबईच्या युवा गोलंदाजांनी मेघालयाच्या मुलींना 25.4 षटकांत अवघ्या 19 धावांत गुंडाळत 544 धावांच्या विश्वविक्रमी विजयाचीही नोंद केली. आता मुंबईची उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राशी गाठ पडेल.

मुंबईच्या इराने पहिल्या षटकापासून मेघालयाच्या दुबळय़ा गोलंदाजीच्या चिंधडया उडवत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. तिने कर्णधार हर्ली गालाच्या (116) साथीने दुसऱया विकेटसाठी 274 धावांची भागी रचली. इराने आपल्या खेळीत 42 चौकारांसह 16 षटकारांचा वर्षाव केला. 19 वर्षांखालील महिलांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीने केई संघाविरुद्ध 2010 साली नाबाद 427 धावांची खेळी केली होती.

फक्त फटकेबाजीचा आनंद घेतला

मेघालयाची गोलंदाजी काहीशी कमकुवत होती आणि चेंडूही बॅटच्या टप्प्यात येत होते. त्याचा फायदा उठवत मी फक्त मनमुराद फटकेबाजी केली. मी कोणत्याही विक्रमासाठी खेळत नव्हती. या झंझावातामुळे माझी कोणत्या स्पर्धेत निवड व्हावी, ही अपेक्षा नाही. मी फक्त माझा खेळ केलाय. सध्या माझा फोकस फक्त खेळावर असल्याचेही त्रिशतकवीर इराने सांगितले.