>> मंगेश वरवडेकर
आपल्या मऱ्हाटमोळ्या खो-खोचा पहिला वर्ल्ड उद्या सोमवारपासून सुरू होतोय. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेला खो-खोचा आंतरराष्ट्रीय प्रवास वर्ल्ड कपच्या टप्प्यावर पोहोचलाय. हा टप्पा यशस्वी ठरला तर त्याला आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकचे शिखर गाठणे फार कठीण नसणार. खो-खो वर्ल्ड कपच्या निमित्ताने का होईना हा दोन शब्दांचा खेळ जगभरातील शेकडो देशांनाही कळेल. पण वर्ल्ड कपच्या निमित्ताने सर्वांनाच उत्सुकता आहे खो-खोच्या इतिहासाची, जन्माची माहिती जाणून घेण्याची.
खो-खो खेळाचा जन्म कसा झाला…? खो-खो खेळाला नाव कसे पडले…? याचा शोध घेण्यासाठी अनेक दिग्गजांशी संपर्क साधला, पण खो-खोच्या उगमाची निश्चित माहिती कुणाकडेही ािमिळू शकली नाही. कुणी म्हणतं की खो-खोचा उगम रामायणात झालाय… कुणी म्हणतं महाभारतात झालाय… काहींनी तुकारामांचे अभंग आणि ज्ञानेश्वरीत संदर्भ आल्याचे सांगून खो-खो पुरातन काळापासून खेळला जात असल्याचे दाखले देण्याचा प्रयत्न केला.
खो-खोच्या संदर्भात एक माहिती मात्र अचूक लाभली की, खो-खो हा शतकापेक्षा जुना खेळ नाही. तो कुठून आला, कसा खेळ झाला याचे निश्चित दाखले नसले तरी हा खेळ महाराष्ट्रात वाढला, रुजला आणि नंतर देशाच्या कानाकोपऱयात पोहोचला. हिंदुस्थानात हा खेळ आजही महाराष्ट्रातच सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे खो-खो महाराष्ट्राच्या मातीतच जन्मल्याचे अनेक बोलताहेत.
‘खो’ घालणे किंवा ‘खो देणे’ या शब्दांचा प्रयोग महाभारत काळात आढळत असल्यामुळे हा खेळ प्राचीन हिंदुस्थानी खेळ असावा, असा अंदाज आहे. पण त्याचे कसलेही पुरावे इतिहासात सापडले नाहीत. कौरव-पांडवांचे वास्तव्य उत्तर हिंदुस्थानात होते, पण उत्तर हिंदुस्थान असो किंवा दिल्लीच्या कोणत्याही सम्राटाच्या काळात खो-खोचा चुकूनदेखील उल्लेख आढळलेला नाही. मात्र पुणे, नाशिक-सिन्नर, बडोदा, नागपूर या मऱ्हाटमोळ्या वस्तीत मात्र खो-खो गेली पाऊणशे ते शंभर वर्षांच्या काळात खेळला गेल्याचा उल्लेख आढळतोय. विशेष म्हणजे खो-खो हा अत्यंत तंत्रशुद्ध आणि कमाल वेगाने खेळला जाणारा क्रीडा प्रकार असल्यामुळे त्याचे साधर्म्य अॅथलेटिक्स आणि मैदानी खेळांच्या प्रकारांशीच आढळून आलेय. खो-खोइतकी चपळता कोणत्याही खेळात नाही, हे कुणी नाकारू शकत नाही.
असो, खो-खोची प्राथमिक बांधणी आणि नियमावली सर्वप्रथम पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने 1914 साली केल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळला. हाच धागा पकडून असे म्हणता येईल की, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून हा खेळ नक्की खेळला जात आहे. मात्र हा खेळ हिंदुस्थानाबाहेर कोणी-केव्हा व कोणत्या पद्धतीने नेला याबाबतही कसलीही माहिती उपलब्ध नाही. पण या खेळाची साचेबद्ध बांधणी आणि नियमावलीला अंतिम रूप महाराष्ट्रातील दिग्गज खो-खो तज्ञांनीच दिलेय.
सोमवारपासून खो-खोचा वर्ल्ड कप सुरू झाल्यावर अनेकांचे डोळे मोठे होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर फारशी प्रगती न केलेल्या खो-खो स्पर्धेत जगभरातील 20 देश खेळणार आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यातील अनेक देशांना खो-खोची काही माहीत नसल्याची बोंबही काही तज्ञ करतील. खो-खोचे काwतुक करणारे असतीलच, पण सोबतीला टीकाकारही असतील. पण एकच गोष्ट सांगतो जेव्हा क्रिकेटचा वर्ल्ड कप इंग्लंडने आयोजित केला होता तेव्हा हिंदुस्थानी संघ फक्त दोन वन डे खेळला होता. श्रीलंकेसारखा संघ तर थेट वर्ल्ड कपमध्येच उतरला होता. म्हणजे हिंदुस्थान असो किंवा श्रीलंका यांच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभवच नव्हता. म्हणजे कोणत्याही खेळाची आंतरराष्ट्रीय सुरुवात अशीच असते. खो-खोला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हिंदुस्थानी खो-खो महासंघाने वर्ल्ड कपरूपी टाकलेले पहिले धाडसी पाऊल आहे. या पावलांना आता खेचण्याची नव्हे, तर खांद्यावर उचलून नवी उंची गाठण्यासाठी साथ देण्याची गरज आहे. अवघ्या जगाला छातीठोकपणे वरच्या आवाजात सांगण्याची वेळ आलीय, देखो… देखो… ये है खो-खो…