स्टीव्ह जॉब्सची पत्नी काशी विश्वनाथ मंदिरात; दर्शन घेतले पण, शिवलिंगाला शिवू दिले नाही

आयफोनची निर्माती कंपनी अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स सध्या हिंदुस्थानच्या दौऱयावर आहेत. उत्तर प्रदेशात होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी त्या हिंदुस्थानात आल्या आहेत. शनिवारी त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यांच्यासोबत यावेळी निरंजनी आखाडय़ाचे स्वामी कैलाश नंदगिरी महाराजही होते. परंतु, यावेळी त्यांना शिवलिंगाला शिवू दिले गेले नाही. याची चर्चा आता जगभरात रंगली आहे. हिंदुस्थानी पारंपरिक पोशाखात लॉरेन यांनी मंदिरात हजेरी लावली. स्वामी कैलाश नंदगिरी यांनी लॉरेन याना कमला असे नावही दिले.

n   स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना नियमानुसार शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी नसल्याचे कैलाश नंदगिरी महाराज म्हणाले. बिगर हिंदूंना तशी परवानगी नसल्याचे ते म्हणाले. त्यांना गाभाऱयाच्या बाहेरूनच दर्शन घेऊ दिले. आचार्य आणि शंकराचार्यांची ही जबाबदारीच आहे की, आपल्या धर्माचे नियम पाळले गेले पाहिजे. त्या आम्हाला मुलीसारख्या आहेत. त्या परंपरा समजून घेत आहेत. असे ते म्हणाले.

n   लॉरेन शिष्या असल्यामुळे माझ्या मुलीप्रमाणे आहेत असे कैलाश नंदगिरी महाराज म्हणाले. त्यांना मी कमला असे नाव दिले आहेत. तसेच माझे गोत्रही मी त्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले. त्या दुसऱ्यांदा हिंदुस्थानात आल्या असून त्या काही दिवस कुंभ मेळ्यात राहातील . त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या गुरुजींना विचारू शकतात. आपली परंपरा जगभरात पसरायला हवी, असे मला वाटते. असे ते म्हणाले.