झेंग, सबलेंका, झ्वेरेव्ह यांचा विजयारंभ!

ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग किन्वेन, गतविजेती आर्यना सबलेंका व द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव या स्टार खेळाडूंनी वर्षांतील पहिली ग्रॅण्डस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला. पहिल्याच दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे वेळापत्रकानुसार बर्याच लढती होऊ शकल्या नाहीत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या झेंग किन्वेन हिने इनडोअर स्टेडियममधील वातावरणाचा फायदा उठवित सरळ सेटमध्ये विजयी सलामी दिली. महिला एकेरीत या पाचव्या मानांकित खेळाडूने रोमानियाच्या 20 वर्षीय अॅण्का टोडोनी हिचा 7-6(7/3), 6-1 असा पराभव केला. ही लढत 1 तास 56 मिनिटांपर्यंत चालली. अव्वल मानांकित आर्यना सबलेंका हिने अमेरिकेच्या स्लोअन स्टिफन्सचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करीत दुसरी फेरी गाठली. ही लढत 1 तास 11 मिनिटांपर्यंत चालली. पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याने फ्रान्सच्या लुकास पौइलचे आव्हान 6-4, 6-4, 6-4 असे परतावून लावले. ही लढत 2 तास 21 मिनिटांपर्यंत चालली.