हिवाळ्यामध्ये उत्तर ध्रुवाकडून हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरी भागातही येणाऱ्या काही स्थलांतरित पक्ष्यांची माहिती आपण लेखात घेतली. हे सारे पक्षी नयनरम्य असल्याने त्यांना पाहण्यासाठी अनेक ट्रेक आयोजित केले जातात. मुंबईपासून सुमारे 70 किलोमीटरवरच्या एका खेड्यातील फार्महाऊसवर आम्हीही गेल्या आठवड्यात पहाटेचं खरं धुकं (धुरकं नव्हे!) आणि विविधरंगी पक्षी न्याहाळण्याची मौज अनुभवली. उत्तम प्रतीचे कॅमेरे असलेली काही तरुण मंडळी या पक्ष्यांचे फोटोही घेत होती.
पक्ष्यांचे फोटो घेणे तसं कठीणच. कारण सभोवतालाविषयी सतत सजग असलेल्या पक्ष्यांना पाहून आपल्याला आनंद वाटत असला तरी फोटोग्राफीची का होईना, पण आयुधं घेऊन येणाऱया उत्साही (काही अतिउत्साही) माणसांचे ‘थवे’ पाहून पक्ष्यांचे थवे बावरतात. एका झाडाच्या फांदीवर ‘क्षणाचा विसावा’ घेत कीटकभक्ष्य न्याहाळण्याच्या त्यांच्या दिनचर्येत बाधा येते आणि ते उडून दूर जातात. कोणी झाडांच्या पानांमध्ये दडतात. शांतपणे दुरून, पक्ष्यांना त्रास न होता, उत्तम लेन्सद्वारे फोटोग्राफी करणाऱयांना खूप प्रयत्न आणि सहनशीलतेनंतर हवे तसे फोटो मिळू शकतात. या मंडळींमध्ये काही पक्षीमित्र आणि पक्ष्यांची माहिती असलेले असतात.
त्यांच्याशी बोलताना पक्ष्यांचं ‘जग’ थोडफार समजतं. पक्ष्यांच्या विविध प्रजाती, स्थलांतरित पक्ष्यांची मूळ निवासस्थानं, त्यांचा आपल्याकडे येण्याचा काळ आणि त्यांचा जीवनक्रम तसंच जीवनशैली याविषयी खूप काही जाणून घेता येतं. एकदा आम्ही नाशिकजवळच्या नांदुरमधमेश्वर भागात पक्षी निरीक्षणासाठी पहाटेच्या थंडीत गेलो होतो. त्यासाठी आधीच्या रात्री तिथेच राहिलो होतो. त्या रम्य पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने आलेली जाग आणि नंतर अनेक स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचं झालेलं दर्शन जीवनानंदाची ‘श्रीमंती’ वाढवणारं ठरलं. त्यानंतर त्यावर एक ‘रिपोर्ट’वजा लेखही लिहिला. पत्रकारितेत असे क्षण क्वचित येतात, पण कायमचे लक्षात राहतात.
…तर हे हिवाळी पाहुणे उत्तर ध्रुवाकडून येतात हे आता बहुतेकांना ठाऊक आहे, पण मनाशी सहज असा विचार येतो की, आपण प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवासाच्या तयारीत बराच काळ घालवतो. प्रवास लांबचा असेल तर चर्चेपासून सुरुवात. ट्रेन की विमान? परदेशी जायचं तर कुठल्या एअरलाइन्सने? कपडे किती घ्यायचे? वजन किती चालतं? वगैरे वगैरे. पक्षी मंडळींना यातलं काही करावं लागत नाही. ‘प्लॅनिंग’ त्यांच्या निसर्गदत्त जीवनशैलीतच दडलेलं असतं. म्हणजे उत्तर धुवीय प्रदेशातला भयंकर हिवाळा सुरू झाला की, त्यांना ‘घर’ बदलावंच लागतं. त्यांच्या जीवनक्रमाचा तो अविभाज्य भाग असतो. तसं नाही केलं तर त्यांना जगणंच कठीण होईल.
या सर्व गोष्टींचा उपजत अंदाज असल्याने आपल्याकडच्या हिवाळ्याच्या आरंभी किंवा त्याआधीच त्यांची आकाशी झेप सुरू होते. रशियाकडून अमेरिकेने घेतलेले अलास्का ते संपूर्ण पॅसिफिक महासागर ओलांडून थेट दक्षिण ध्रुवाजवळचं न्यूझीलँड गाठणं म्हणजे खाऊ नव्हे! परंतु असा प्रवास इवलेसे वाटावे असे पक्षी सहज करतात. त्यांच्या ‘नॅव्हिगेशन’विषयी पुढच्या लेखात. या लेखात सर्वात मोठी ‘झेप’ घेणाऱ्या पृथ्वीवरच्या ‘गॉडविट’ या पक्ष्याविषयी.
हा पक्षी दलदलीतील कीटक किंवा शिंपल्यातील जीव शेलफिश अथवा लहानशा गोगलगायींच्या शोधात हजारो किलोमीटरचा प्रवास करतो. सबंध पॅसिफिक समुद्र ओलांडून सुमारे 13 हजार किलोमीटर उडतो. तोही एका झेपेत न थकता!
अंगावर ठिपके असलेला, तपकिरी रंगाचा, चिखलात उभं राहण्यासाठी योग्य अशा लांब पायांचा आणि लांब चोचीचा हा देखणा पक्षी अलास्कात पंख पसरतो तो अवकाश ‘पेलत’ थेट न्यूझीलँड किंवा ऑस्ट्रेलियाच्या किनाऱयावर उतरतो. यातले काही पक्षी हिंदुस्थानच्या पूर्व सागरी किनारपट्टीवरही येतात. त्याचा ‘टू अॅण्ड फ्रो’ किंवा येता-जाताना केलेला आकाशी प्रवास सुमारे 27 हजार किलोमीटर होतो.
शैवाल (शेवाळं) असलेल्या जागी छोटंसं खोलगट (वाडग्यासारखं) घर (नेस्ट) बनवणारे हे ‘बार टेल्ड गॉडविट’ पक्षी 5 ते 33 वर्षे जगतात. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास करणाऱयांना ते अनेक वर्षे ठरावीक काळात बरोबर एकाच ठिकाणी आलेले दिसतात. ऋषितुल्य पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांना मुंबईत चेंबूरच्या गोल्फ क्लबवर दरवर्षी त्याच तारखेला अवतरणारा असा वार्षिक पाहुणा दिसला होता. मुंबईतही माहीमच्या पक्षी अभयारण्यात अनेक पक्षी येतात. ते ठाऊक असायला हवं. राज्यात इतरत्र अधिक वनश्री आणि पाणथळ जागी येणाऱया स्थलांतरित पक्ष्यांची संख्याही मोठी आहे.
अर्धा किलोमीटर ते 60 हजार मीटर उंचीवरून एका दमात 13 हजार किलोमीटर उडणारा गॉडविट अवघ्या 450 ग्रॅम वजनाचा असतो. म्हणजे पुरतं अर्धा किलोसुद्धा त्याचं वजन नसतं, पण फिगर काय नि जिगर काय बघा ना! त्याचा आधुनिक अभ्यास 1417 पासून सुरू झाला. वयाच्या अवघ्या दुसऱया वर्षी हा पक्षी वयात येतो आणि पुढच्या पिढीपर्यंत ‘उडता’ वारसा सोपवण्याची जबाबदारी सोपवेपर्यंत अथक उडत राहतो. यातला नर लहान चणीचा तर मादी थोडी मोठी दिसते. मीलनाच्या काळात ही जोडपी नऊ प्रकारचे वेगवेगळे आवाज काढून परस्परांना संकेत देतात. कधी गोल तर कधी लंबवर्तुळाकार घिरटय़ा घालतात. नर आणि मादी दोघंही पुढच्या पिढीच्या जन्मासाठीची अंडी उबवतात. अंडी घालणारी मादी रात्री तर नर दिवसा हे काम करतो. छोटय़ा पिलांचा पिसारा ‘फुलला’ की, तीही वयात येतात आणि पुढच्या झेपेला सिद्ध होतात. त्यांचा हा जीवनक्रम हजारो वर्षे चाललाय.