वाल्मीक कराडवरही मकोका लावला पाहिजे, सुरेश धस यांची मागणी

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. पण वाल्मीक कराडवरही मकोका लावला जावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसेच परळीत अजूनही राखेच्या टिप्परची अवैध वाहतूक सुरू आहे असा आरोपीह धस यांनी केला.

माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, परळीबाबत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू असताना राखेचे टिप्पर बंद नाहीत. या राखेच्या टिप्परची अवैध वाहतूक सुरूच आहे. आणि याला परळीचे पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत. 141 शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन द्यायची होती, पण या लोकांनी पाच हजारहून अधिक शेतकऱ्यांकडून त्यांनी पैसे जमा केले आहेत. तसेच पंढरपूरमध्ये या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. असेच गुन्हे हे कोल्हापूर, बीड आणि पुण्यात दाखल होतील. ज्या लोकांनी पैसै मागितले काहींना धमकी दिली तर काहींना मारहाणही केली गेली. यामध्ये आका आणि आकाचे आका दोघे सहभागी आहेत. यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून महाराष्ट्राच्या जनतेपुढे हा घोटाळा आलेला आहे. सात आरोपींवर मकोका लावला आहे, पण आकावरही मकोका लावावा अशी आमची अपेक्षा आहे असेही धस म्हणाले.