महिला डॉक्टर उपस्थित नसल्याने हाडांच्या डॉक्टरने महिलेची महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया केली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान एक कापली गेली आणि अतिरक्तस्त्रावाने महिलेचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका खाजगी नर्सिंग होममध्ये ही घटना घडली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांना शांत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सोनम राजपूत या महिलेला शुक्रवारी सायंकाळी झाशीतील चिरंजीव रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. पत्नीला प्रसुतीसाठी नेले तेव्हा एकही महिला डॉक्टर उपस्थित नव्हती, असा आरोप सोनमच्या पतीने केला.
रुग्णालयाचे संचालक आणि ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. संजय त्रिपाठी यांनीच पत्नीवर प्रसूती शस्त्रक्रिया केली. शस्त्रेक्रियेदरम्यान तिची नस कापली गेली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव थांबत नसल्याने सोनमचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सोनमच्या मृत्यूची माहिती रात्रभर कुटुंबापासून लपवून ठेवली, असेही तिच्या पतीने आपल्या आरोपात म्हटले.
डॉक्टरांनी सकाळी सोनमचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. यानंतर कुटुंबीय संतापले आणि त्यांनी रुग्णालय आणि डॉक्टरवर कारवाईची मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.