मुंडे बहीण भावामुळे बीड बदनाम, अंजली दमानिया यांची टीका

सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे अशी टीका भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. पण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांमुळे बीड बदनाम झाले आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच धस हे पण त्यातलेच एक आहेत असेही दमानिया म्हणाल्या.

एक्सवर पोस्ट करून दमानिया म्हणाल्या की, पंकजा मुंडे ताई तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याचे मी स्वागत करते. तुमच्या मतदार संघात झालेल्या इतक्या क्रूर हत्येबद्दल तुम्ही खरंतर रोज बोलायला हवं होतं, त्या कुटुंबाच्या घरी जायला हवं होतं, जन आक्रोश मोर्च्यात सहभागी व्हायला हवं होतं. पण तुम्ही ह्यातलं काहीच केलं नाही. बीड बदनाम आपोआप नाही होत, तुम्ही भावबहिणीने बदनाम केलं आहे तुमच्या दहशतीने. धस पण त्यातलेच एक आहेत.

तसेच पंकजा मुंडे तुम्ही बीड मधेच राहता आणि तुम्ही एक महिला देखील आहात, पण तुम्ही हे विसरता की हे गुंड तुमचेच आहेत आणि तुम्हाला सुरक्षा आहे, सामान्य जनतेला नाही. तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागते असेही दमानिया म्हणाल्या.