महानगर पालिका स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा – संजय राऊत

महाविकास आघाडी, इंडिया आघाडी फुटली आहे असे मी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने म्हटलेले नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिले. तसेच महानगर पालिका स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे सगळ्यांसोबत चर्चा करतात. काँग्रेस नेत्यांनी माझं विधान व्यवस्थित ऐकावं. ऐकण्याचीही सवय झाली पाहिजे. मी इतकंच म्हणालो की, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्वांनी इंडिया आघाडी बनवली. विधानसभेसाठी आम्ही महाविकास आघाडी बनवली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निवडणूक आपण लढवावी. जेव्हा तीन ते चार पक्ष एकत्र निवडणूक लढवतात तेव्हा कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. यासाठी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, त्या उद्धव ठाकरे जाणून घेत आहेत असे संजय राऊत म्हणाले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गोष्ट वेगळी होती. पण महानगरपालिका निवडणूक जर स्वबळावर लढलो तर पक्षाचा विस्तार होईल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कारण आमचे निवडणूक चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगर पालिका निवडणुकीतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याची पक्षाला संधी मिळते. आणि हे सगळ्याच पक्षांचं मत आहे. इंडिया आघाडी तुटली, महाविकास आघाडी तुटली असे म्हणालो नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भुमिका मांडली. तर त्यात कुणाला मिरची लागण्याचे कारण नाही असे संजय राऊत म्हणाले.

तसेच आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो तेव्हाही आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकी वेगवेगळ्या लढलो आहोत, त्यात नवीन काही नाही. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना बुथ लेव्हल वर काम करण्याची गरज आहे. आता आमच्याकडे वेळ आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी साडेचार वर्ष बाकी आहे. पक्ष आणि संघटना बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी वेळ दिला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना वेळ दिली पाहिजे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी बुथ मजबूत करण्याची एक चळवळ हाती घेतली पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी, इंडिया आघाडी फुटली आहे असे मी किंवा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने म्हटलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत आम्ही भुमिका मांडली आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर राज्यभरातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्याना भेटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती. आम्ही भाजपसोबत असतानाही स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या होत्या असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.