वसईत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या दस्त्याने सराफाचे डोके फोडून लूट

अग्रवाल सिटी येथील मयंक ज्वेलर्सवर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी दुकानात घुसून सराफाचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळून एका खोलीत डांबून ठेवत हाताला लागतील तेवढे लाखो रुपयांचे दागिने घेऊन दुचाकीवरून धूम ठोकली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबत माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दरोडेखोरांच्या मागावर पथके रवाना केली आहेत.

बाभोळा येथील अग्रवाल दोशी कॉम्प्लेक्समध्ये मयंक ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात मालक रतनलाल संघवी (67) आणि त्यांचा मुलगा मनीष संघवी हे असतात. शुक्रवारी मनीष संघवी कामानिमित्त बाहेर गेला होता. रात्री सवानऊच्या सुमारास रतनलाल दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. ते दागिन्यांचे ट्रे कपाटात ठेवत होते. त्याचवेळी तोंडाला मास्क आणि हेल्मेट घालून दोन हल्लेखोर दुकानात शिरले.

आत शिरताच चोरट्यांनी बंदुकीने संघवी यांच्यावर हल्ला केला. यात रतनलाल गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना खोलीत डांबून लाखोंचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले. दरोडेखोरांनी हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधले होते. या घटनेने खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांनी परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी केली आहे.

रेकी केल्याचा संशय

हल्लेखोर अचानक दुकानात शिरले आणि त्यांनी बंदुकीने संघवी यांना मारहाण करत दुकान लुटले अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. यात आणखी आरोपींचा समावेश आहे का याचा तपास सहा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांमार्फत सुरू आहे असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यापूर्वी दरोडेखोरांनी रेकी केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिवशाहीतून पावणेदोन कोटींचे दागिने लांबवले

सोन्याचे व्यापारी किरणकुमार पुरोहित हे शिवशाही बसने नाशिकहून संगमनेरमार्गे मुंबईत येत होते. मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डीजवळील उंबरमाळी येथील हॉटेल फेमस येथे ही बस थांबली असता चौकडीने शिताफीने पुरोहित यांची सोने-चांदीने भरलेली बॅग पळवून नेली. यात तब्बल 1 कोटी 68 लाख रुपयांचे दागिने होते. पुरोहित हे पाणी बॉटल घेण्यासाठी गाडीतून उतरताच चोरट्यांनी ही हातचलाखी केली. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.