विक्रमगडमध्ये शेवग्याच्या शेंगांना सोन्याचा भाव, एका नगासाठी मोजावे लागतात आठ रुपये

सांबार असो की भाजी त्यात शेवग्याची शेंग असेल तर त्याची चव काही औरच असते. आरोग्यासाठीदेखील ही शेवग्याची शेंग अतिशय गुणकारी मानली जाते. मात्र याच शेवग्याच्या शेंगाला सध्या सोन्याचा भाव आला आहे. विक्रमगडमध्ये तर एका नगासाठी आठ रुपये मोजावे लागत असून शेतकऱ्यांना मात्र त्यामुळे सुगीचे दिवस आले आहेत.

विक्रमगड तालुक्यात शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. बाजारपेठेत या शेंगांना मोठी मागणी असून आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. विक्रमगडमधील पाड्यांवर राहणारे आदिवासी बांधव या शेवग्याच्या शेंगा तोडून त्याची जुडी तयार करतात व या जुड्या विकण्यासाठी पायपीट करीत बाजारपेठेमध्ये येत आहेत. एका जुडीत फक्त तीन शेंगा बांधल्या जातात. 25 रुपयांना ही जुडी विकण्यात येत आहे.

शेवग्याच्या शेंगामध्ये औषधी गुणधर्म आहे. या शेंगामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमणात आढळते. थंडीच्या दिवसात शेवग्याच्या शेंगाची भाजी आरोग्यासाठी अधिक चांगली असल्याने व चवीलाही त्याची भाजी चांगली लागते. त्यामुळे शेवग्याला मागणी वाढली आहे. येत्या पंधरवड्यात शेवगा शेंगाचे उत्पादन वाढेल व नंतर 8 रुपयांची शेंग 2 रुपयांवर येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या तरी शेंगाला सोन्याचा भाव आला आहे.

शेवग्याची शेंग जरी नैसर्गिक असली तरी शेंगा झाडावरून पाडण्याकरिता मजुरी द्यावी लागते. तसेच बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठीदेखील वाहतुकीचा खर्च येतो. सध्या आवक कमी आल्याने त्याचे दर वाढले असल्याचे शेतकरी विजय सांबरे यांनी सांगितले.