भेसळयुक्त कडधान्य विकणाऱ्या परप्रांतीयांना येथील व्यापाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हे परप्रांतीय तूरडाळीची नावाखाली लाख डाळ विकत होते. त्यांच्याकडे असलेले कडधान्यही निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत-दहिवली रस्त्यावर उभा करण्यात आलेल्या टेम्पोमधून स्वस्तात कडधान्याची विक्री केली जात होती. बाजारात जास्त किमतीत विकले जाणारे कडधान्य हे या ठिकाणी स्वस्तात म्हणजे 50 ते 60 रुपये किलो या दराने ग्राहकांना दिले जात होते. त्यामुळे टेम्पोभोवती नागरिकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी कर्जत शहरातील व्यापारी चिराग ओसवाल आणि अन्य तरुण आले. त्यांनी हे भेसळयुक्त आणि आरोग्याला हानीकारक असलेले धान्य पाहिल्यानंतर या परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
तूरडाळीच्या नावाखाली लाख डाळ विकणे म्हणजे कर्जतकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ आहे. त्यामुळे या परप्रांतीयांवर अन्न आणि औषध प्रशासनानेही कारवाई करावी अशी मागणी चिराग ओसवाल यांनी केली आहे.