झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना शर्ट काढण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी विनंती करुनही प्राध्यापकांनी शिक्षा म्हणून शर्ट काढण्याचे आदेश दिले. 50 हून अधिक विद्यार्थिनींना शर्टशिवाय ब्लेझर घालून घरी जाण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती आहे.
10 वीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील काहीच महिने उरले आहेत. त्यामुळे झारखंडमधील शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणी जपण्यासाठी म्हणून मित्रमंडळींच्या शर्टवर एकमेकांची नावे आणि काही शुभेच्छा लिहिल्या होत्या. मात्र हे पाहून मुख्याध्यापकांचा राग अनावर झाला. त्यांनी विद्यार्थिनींना खडेबोल सुनावले. एवढ्यावर ते थांबले नाही तर विद्यार्थ्याीनींना असे कृत्य केल्याबद्दल शर्ट काढून ब्लेझर घालून घरी जाण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मुली त्याच अवस्थेच घरी पोहोचल्या. यावेळी मुलींना अशा अवस्थेत बघून त्यांचा पालकांना धक्का बसला. मुलींच्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या शिक्षेवर प्रश्न उपस्थित केले. मुलींचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यांच्या परीक्षा जवळ आल्याने मुलं मानसिक दडपणाखाली असतात. अशातच, शाळेच्या या गैरकृतीमुळे मुली डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती आहे. मुलींसोबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न मुलींच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाला केला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. उपायुक्त माधवी मिश्रा यांनी शाळेवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.