विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजन नगरमध्ये नाल्याशेजारील अस्वच्छतेमुळे रहिवासी हैराण झाले होते. त्यातच साप आणि विंचूने रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली होती. या पार्श्वभूमीवर नाला आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी शिव आरोग्य सेनेचे पालिकेच्या ‘एन’ विभागाकडे केली होती. अखेर शिव आरोग्य सेनेच्या मागणीला यश आले असून पालिकेकडून या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली.
विद्याविहार पूर्वेकडील चित्तरंजन नगर परिसरातील अस्वच्छतेमुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱया पादचाऱ्यांना नाल्याशेजारच्या रस्त्यावरून जाताना साप आणि विंचू दिसत होते. जवळच असलेल्या राजावाडी रुग्णालयात येणाऱ्या परिचारिका व इतर महिलांनादेखील असाच अनुभव सातत्याने आल्यावर त्यांनी ही बाब शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी व विधानसभा संघटक सचिन भांगे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ, मुंबई जिल्हा समन्वयक अमोल वंजारे यांच्या सूचनेनुसार मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, सचिन भांगे यांनी सहाय्यक आयुक्त ‘एन’ विभाग यांना पत्र देत त्वरित या विभागाची स्वच्छता करून सरपटणाऱया प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. यासंदर्भातील दैनिक ‘सामना’मध्ये वृत्त प्रकाशित होताच सहाय्यक आयुक्त गजानन बल्लाळे यांनी त्वरित या विभागाची स्वच्छता करून घेतली.