कलाप्रेमींनी साधला वीकेण्डचामुहूर्त, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल हाऊसफुल्ल

कला, संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडवणाऱया छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हलला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. वीकेण्डचा मुहूर्त साधत शनिवारी या महोत्सवात कलाप्रेमींची हाऊसफुल्ल गर्दी झाली. ‘दर्यापती शिवराय’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या. कलात्मक वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉल्सवर झुंबड उडाली होती.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच ‘वेध’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅड. साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी दरवर्षी या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून येथील कलात्मक वस्तूंचे स्टॉल, बच्चे कंपनीसाठी आयोजित केलेले ‘किड्स कार्निव्हल’, आर्ट गॅलरी, विविध कलात्मक कार्यशाळा यांना पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

उद्या, रविवारी या महोत्सवाची सांगता होणार आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजता ‘हार्मो नो नियम’ तर सायंकाळी 6.30 वाजता ‘थ्री मोन्क्स बँड’ हा कार्यक्रम सादर होईल. हे दोन्ही कार्यक्रम पालिका क्रीडा भवनात होतील. अमित धने यांचे पोर्ट्रेट वर्कशॉप, ‘निर्मिती’च्या वतीने टाय अॅण्ड डाय ऑन हँकर चीफ आणि टोटे बॅग पेंटिंग अशी वर्कशॉप होणार आहेत.