संतोष देशमुख फिर्याद देण्यासाठी गेले होते… कुणाच्या फोनवरून त्यांची फिर्याद नाकारली? सुरेश धस यांचा गंभीर आरोप

खंडणीला विरोध केला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. अवादा कंपनीत वाद झाला त्याच दिवशी संतोष देशमुख पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. ‘त्यांची फिर्याद घेऊ नका’ असा फोन ज्याने केला, तो या प्रकरणात प्रमुख आरोपी झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धाराशीव येथील निषेध मोर्चात केली. 19 ऑक्टोबर रोजी ‘सातपुडा’ बंगल्यावर बैठक घेणारा आरोपी कसा नाही, असा सवालही आमदार धस यांनी केला.

धाराशीव येथे शनिवारी संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिजाऊ चौकातून निघालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर सभेत रूपांतर झाले. या मोर्चात संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब, खासदार बजरंग सोनवणे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुरेश धस, कैलास पाटील, संदीप क्षीरसागर, प्रवीण स्वामी, राणा जगजितसिंह पाटील, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आमदार धस यांचे गौप्यस्फोट

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या आक्रोश मोर्चातही एकामागून एक गौप्यस्फोट केले. संतोष देशमुख यांना मारहाण करताना ‘आका’ला व्हिडीओ कॉल करून दाखवण्यात आले. तोच व्हिडीओ आता न्यायालयात सादर करण्यात आला आहे. खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची निर्दयतेने हत्या करण्यात आली. कंपनीत वाद झाल्यानंतर संतोष देशमुख हे फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु, ‘त्यांची फिर्याद घेऊ नका’ असा पह्न आला. या पह्नची एसआयटीने चौकशी करावी, अशी मागणी आमदार धस यांनी केली. भगवानगड, नारायणगडाची फक्त नावेच ही लोपं घेतात, त्यांचे विचार यांच्याकडून पाळले जात नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

महासंस्कृतीमहोत्सवावर पाच कोटींची उधळण

बीडमध्ये ‘आका’ने 2024 मध्ये महासंस्कृती महोत्सव घेतला. या कार्यक्रमावर सगळा मिळून खर्च झाला दहा लाख. जिल्हाधिकाऱयांकडून माहिती घेतली असता पाच कोटी रुपये उधळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळाले होते. पण ते ‘आका’ने काढून मिनाज फारुकी नावाच्या व्यक्तीला दिले. याची चौकशी करावी, अशी मागणी ईडी आणि एसआयटीकडे केल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले.

अजितदादा, हे वागणे बरे नव्हे

संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी, खंडणी प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचा धोशा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावला आहे. काल सारंगी महाजन काय म्हणाल्या हे अजितदादांनी ऐकलेले दिसत नाही. सुनेत्रावहिनी, पद्मसिंह पाटील, पवनराजे निंबाळकर यांच्या गावातून बोलतोय. अजितदादा, धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून हाकला! याला सत्तेत ठेवले तर सकाळपासूनच हा माणसे मारायला लागेल. वाल्मीक कराडची दुसरी बाजूही बघितली पाहिजे, असे धस म्हणाले.

कराडवर मकोका का नाहीमनोज जरांगे

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत. मग वाल्मीक कराडवर मकोका का नाही, असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे सगळय़ांना मकोका लागलाच पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. जर दगाफटका झाला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. धाराशिव येथे पोलीस अधिकाऱयाच्या तीनवर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाला. या प्रकरणात त्या नराधमाला, त्याच्या आईबापाला अजून अटक का झाली नाही? हे सरकारला महागात पडेल, असेही ते म्हणाले.

अठरा वर्षे झाली, मला न्याय नाही ओमराजे निंबाळकर

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत घडलेला सगळा प्रसंग डोळय़ासमोर आला. माझे वडील पवनराजे यांची हत्या झाली तेव्हा मी देखीलवैभवी एवढाच होतो.  तिचे दुःख मी समजू शकतो. या गुन्हेगारांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही, असे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले. पवनराजेंच्या हत्येला अठरा वर्षे झाली, पण अजून न्याय मिळाला नाही. त्यामुळे संतोष देशमुखांचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कराडचा सहकारी मुंबईतील विश्रामगृहात पोहचवायचा पैसे

वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचे रोज नवनवीन कारणामे समोर येऊ लागले आहेत. कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना तत्काली कृषीमंत्र्याशी आपली ओळख असल्याचे सांगून कोटयावधी रूपयांचा गंडा घातला. हार्वेस्टिंग मशीनला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान देतो असे सांगून कराडने 140 मशीन मालकांकडून प्रत्येकी 8 लाख गोळा केले. हे सर्व पैसे एका पोत्यात भरूने मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांच्याकडे पोहचविण्यात आल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रही समोर आली आहेत. वाल्मीक कराडला दिलेल्या सर्व नोटांचे शुटींग, नोटांचे नंबर आणि काही फोटोही आहेत. याशिवाय तात्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटायला गेल्याचे सर्व रेकॉर्ड देखील पोलीस प्रशासनाकडे देण्यात आलं आहे.

आई, तुझ्या दरबारी आले… आता तूच न्याय कर

संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे मनोगत ऐकून मोर्चेकरी हेलावून गेले. आई, तुझ्या दरबारी आले आहे. सरकारने न्याय दिला नाही तर तूच न्याय कर, दुष्टांचा संहार कर, असे साकडे तिने तुळजाभवानीला घातले. पप्पांच्या हत्येनंतर सगळा समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. त्या सगळय़ांमध्ये मला माझे वडीलच दिसतात. काय दोष होता त्यांचा? का त्यांची एवढय़ा अमानुषपणे हत्या करण्यात आली? त्यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ लावण्यासाठी आमचे मन धजावत नाही. पण समाजाचा आधार, मनोज जरांगेदादा तब्येत बरी नसतानाही आमच्यासोबत येत आहेत हे सगळे उभारी देणारे आहे, असे वैभवी देशमुख म्हणाली.