नऊ कोटींची मालमत्ता जप्त, त्या 14 कार करणार हस्तगत; टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दादर येथील कार्यालयातून आतापर्यंत तब्बल नऊ कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच कंपनीने ज्या एजंटना 14 कार गिफ्ट दिल्या होत्या त्या कार पोलीस हस्तगत करणार आहेत.

गुंतवणुकीवर आठवडय़ाला आकर्षक परतावा देणार असे आमिष दाखवत टोरेस कंपनीने हजारो नागरिकांची कोटय़वधींची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुह्याची व्याप्ती मोठी असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस पोलिसांनी चार ठिकाणी झाडाझडती घेतली.

या कारवाईत तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड तसेच खडे, अन्य साहित्य असा मिळून एकूण नऊ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातील 77 लाख व्हॅलेंटिना हिच्या कुलाबा येथील भाडय़ाने घेतलेल्या घरात सापडले होते. दरम्यान, आतापर्यंत फसवणूक झालेल्या 1535 गुंतवणूकदारांनी आपले अर्ज पोलिसांकडे दाखल केले आहेत.

दादरच्या कार्यालयाचे 25 लाख दर महिना भाडे

टोरेस कंपनीने दादर येथे तळ अधिक दोन मजल्यांचे कार्यालय भाडेतत्त्वावर घेतले होते. या कार्यालयाचे दर महिन्याला 25 लाख इतके भाडे दिले जात होते. तब्बल 11 हजार 500 स्क्वेअर फूट क्षेत्रफळ इतक्या आकाराचे ते कार्यालय होते.

त्या 14 कारचा शोध सुरू

जास्तीत जास्त नागरिकांना गुंतवणूक करण्यास सांगून गुंतवणूकदारांची साखळी तयार करणाऱया एजंट लोकांना कंपनीकडून आकर्षक परतावा तसेच गिफ्ट म्हणून कार देण्यात आली होती. ज्यांना कार दिल्यात अशा 14 जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या 14 कार पोलीस हस्तगत करणार आहेत. दरम्यान, कंपनीने अशा एजंटना आयफोन तसेच सोन्याचे रिंगदेखील दिल्याचे समजते. पोलीस यांचा अधिक तपास करत आहेत.