प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रत्येक वॉर्डात मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स! धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा निर्णय

मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धूळ कारणीभूत असल्याचे समोर आल्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डात चार मोबाईल ‘डस्ट सक्शन‘ मशीन घेणार आहे. या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये महत्त्वाचे जंक्शन, धूळ निर्माण होणाऱ्या ठिकाणांसह संपूर्ण वॉर्डमध्ये या मोबाईल व्हॅन फिरत राहणार असून धूळ नियंत्रणाचे काम करणार असल्याची माहिती पर्यावरण उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली.

मुंबईत नोव्हेंबरपासून हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईभरात सुरू असलेल्या विविध बांधकामांमधून उडणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईभरातील सुमारे पाच हजार बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी 28 प्रकारचे नियमही पालिकेने जाहीर केले आहेत. तर आता पालिकेच्या माध्यमातूनही धूळ नियंत्रणासाठी डस्ट सक्शन मशीन घेऊन काम करण्यात येणार आहे.

‘बेस्ट’च्या सर्व गाडय़ांवर प्रदूषण नियंत्रण यंत्र

‘बेस्ट’मध्ये यापुढे आणल्या जाणाऱया सर्व गाडय़ांवर प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे या गाडय़ा मुंबईत फिरत असताना प्रदूषणही कमी करणार आहेत. बेस्टच्या ताफ्यात लवकरच सुमारे दीड हजार गाड्या आणल्या जाणार असून सर्व गाडय़ांवर अशी यंत्रणा बसवणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे.

पाच वर्षांत सर्व स्मशानभूमी पर्यावरणपूरक

  • पाच वर्षांत मुंबईतील सर्व स्मशानभूमी पर्यावरणपूरक करण्याचे पालिकेने ठरवले आहे. यामध्ये स्मशानभूमी सीएनजी किंवा पीएनजीवर चालणाऱया करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • शिवाय बेकऱयांमध्ये भट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांमुळे बेकऱयांच्या शेगडय़ाही इलेक्ट्रिक, सीएनजी किंवा पीएनजीवर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.