महत्त्वाचे – पोलीस शिपाई परीक्षेत उमेदवार कॉपी करताना सापडला

आज घेण्यात आलेल्या पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेत एक उमेदवार कॉपी करताना सापडला. कृष्णा दळवी (25) असे त्या उमेदवाराचे नाव असल्याचे सांगण्यात येते. पोलीस शिपाई चालक पदासाठी आज लेखी परीक्षा घेण्यात आली. जोगेश्वरी पश्चिमेकडील न्यू लिंक रोडवर असलेल्या रायगड मिलिटरी शाळेत कृष्णा दळवी हा कॉपी करताना सापडला. त्याने चिप लपवून आणली होती, पण त्याची ही लपवाछपवी पकडली गेली. याप्रकरणी त्याच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावीचे ऑनलाइन ओळखपत्र तयार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱया बारावी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट पाहावे. कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी करावी, अशा सूचना मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिल्या आहेत.