सायबर गुन्हेगारीचे धागेदोरे थेट चीन आणि इंडोनेशियापर्यंत; 530 व्हर्च्युअल नंबर पुरवले, एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना अटक

इंडोनेशिया आणि चीनमधील सायबर गुन्हेगारांना 530 व्हर्च्युअल फोन नंबर दिल्याप्रकरणी एअरटेलच्या दोन व्यवस्थापकांना गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. नीरज वालिया आणि हेमंत शर्मा असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सायबर फसवणुकीच्या पीडितेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची पुष्टी केली. सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास मागील आठवडय़ापासून सुरू होता. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नादात पीडित महिलेने 10,000 रुपये गमावले. या महिलेशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात आलेल्या नंबरचा एसटीडी कोड गुरुग्रामचा आढळून आल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

बनावट कंपनीच्या नावे व्हर्च्युअल नंबर

फसवणुकीसाठी वापरण्यात आलेला व्हर्च्युअल नंबर हा एकमदर्श सर्व्हिसेज प्रायवेट लिमिटेड या बनावट कंपनीच्या नावावर होता असे तपासात समोर आले. या नंबरच्या कागदपत्रांमध्ये हरयाणातील गुरुग्राम जिह्यातील डुंडाहेडा या पत्त्याचा उल्लेख होता. या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी न आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेला हा व्हर्च्युअल नंबर नीरज आणि हेमंत एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी जारी केला असल्याची माहिती मिळाली.

आरोपींनी सुरुवातीला पीडित महिलेला वेबपेजवर हॉटेल रिह्यू पोस्ट करण्यासाठी 200 रुपये देऊन पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. तसेच विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. या बदल्यात मोठा परतावा मिळणार असल्याचे भासवण्यात आले. पैसे ट्रान्सफर करताच पीडितेच्या खात्यातील रक्कम वाढत असल्याचे दिसून आले. मात्र, जेव्हा तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या खात्यात तितकी रक्कम नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला. सध्या या कंपन्यांच्या वैधतेची चौकशी सुरू असून हे नंबर कसे वापरले गेले याचाही शोध सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडोनेशिया, चीनमधील गुन्हेगारांना दिले नंबर

आरोपी नीरज हा एअरटेल कंपनीचे फोन नंबर जारी करण्यासाठी व्हेरिफिकेशन हाताळत असे, तर हेमंत त्याचा टीम लीडर होता. या दोघांनी ट्रायच्या नियमांचे उल्लंघन करून बनावट कंपनीला डायरेक्ट इनवर्ड डायलिंग (डीआयडी) व्हर्च्युअल लँडलाइन नंबर जारी केला, अशी माहिती तपासाचे नेतृत्व करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांशू दिवाण यांनी दिली. दोन्ही आरोपींनी इंडोनेशियातील कंपनीला सुमारे 530 व्हर्च्युअल नंबर जारी केले होते. यापैकी अनेक नंबर चीनमधील सायबर गुन्हेगारांना देण्यात आले होते.