महाकुंभमेळ्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये हेलिकॉप्टर सेवेचाही समावेश आहे. सात मिनिटं आसमंतात राहून हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचे दर्शन करता येईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेचा विचार करता या वर्षी संगम दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाईल. पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड सर्व्हिसेसच्या मदतीने ही सेवा 12 ते 28 जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने बुकिंग करता येईल. महाकुंभमेळ्यातील हेलिपॅडवर दोन हेलिकॉप्टर असतील. त्यामधून एका वेळी 4 ते 5 भाविक प्रवास करू शकतील. सात मिनिटांमध्ये संगम दर्शनासह अन्य धार्मिक स्थळांचेही दर्शन करता येईल. गंगा-यमुनेच्या संगमाचे विहंगम दृश्य हवाई सफरीतून पाहता येईल.
महाकुंभला जाणाऱ्यांसाठी 59 रुपयांत ’महाकुंभ विमा’
महाकुंभला रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा कवच देण्यासाठी विशेष ‘महाकुंभ विमा’ सुरू करण्यात आला आहे. हा विमा 59 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये वैद्यकीय खर्चासह बॅगांच्या नुकसानभरपाईपर्यंत सामाविष्ट आहे. फोनपेने ही सुविधा खासकरून महाकुंभ यात्रेकरूंसाठी सुरू केली आहे. फोनपेने यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डसोबत करार केला आहे. धार्मिक यात्रेसाठी जात असलेल्या प्रवाशांचे संभावित धोक्यापासून संरक्षण करता यावे हा यामागील हेतू आहे. केवळ रेल्वेच नाही, तर कंपनी बस प्रवाशांनादेखील विमा सुविधा पुरवत आहे. विमानाने जाणाऱ्या प्रवाशांनाही विमा सुरक्षा आहे. मात्र, त्याचे प्रीमियम 99 रुपयांचे असल्याचे वृत्त आहे. या विमा योजनेची वैधता 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत असेल. दरम्यान, 59 आणि 99 रुपयांचा विमा घेतल्यास विविध बाबतीत सुरक्षा मिळणार आहे. इस्पितळात दाखल केल्यास 50,000 रुपयांपर्यंत मदत केली जाईल. ऐनवेळी यात्रेकरूला जाता न आल्यासही त्याला 5,000 रुपयांपर्यंत कॅन्सलेशन कव्हर मिळेल. यासाठी फोन पेवर इन्शुरन्स सेक्शनमध्ये महाकुंभ इन्शुरन्सवर क्लिक करून माहिती मिळवता येईल.