वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवनवीन फिचर्स आणणाऱ्या व्हॉटस्ऍपने पुन्हा एक नवीन फिचर आणले असून आता इव्हेंट शेडय़ूल करता येणार आहेत. यासाठी वेगळय़ा ऍपचीही गरज भासणार नाही. कंपनी लवकरच वापरकर्त्यांच्या सोयीसाठी चॅटमध्येच इव्हेंट शेडय़ूल करण्याची सुविधा देणार आहे. याआधी फक्त ग्रुप चॅट्सपुरते मर्यादित असलेले हे फिचर व्यक्तिगत चॅट्समध्ये वापरण्यासाठी आणले जात आहे. कम्युनिटी ऍडमिन, कुटुंब आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी हे खूप उपयुक्त असेल. या माध्यमातून एखाद्या कार्यक्रमाची माहिती अगदी सहजपणे शेअर करता येईल.
असे काम करेल फिचर
वापरकर्त्यांना हे फिचर वापरताना इव्हेंटला नाव देणे बंधनकारक असेल. हा पर्याय ऐच्छिक असला तरी यामुळे इव्हेंटचे उद्दिष्ट स्पष्ट होईल. त्यानंतर इव्हेंटचे वर्णन, सुरुवात आणि शेवटची वेळ आदी माहिती नमूद करता येईल. तसेच संबंधित कार्यक्रमाचे ठिकाण अर्थात लोकेशन शेअरिंग तिथे जोडता येईल. याशिवाय आमंत्रित केलेल्या व्यक्तींना होकार किंवा नकार कळवण्याचा पर्याय असेल.