सध्या कॉर्पोरेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 70 ते 90 तास काम करावे, असे वादग्रस्त विधान बडय़ा उद्योगपतींनी केल्यावरून सोशल मीडियावर जोरदार रणसंग्राम सुरू असताना यात आणखी भर म्हणून कॅपिटल माइंडचे संस्थापक व सीईओ दीपक शेनॉय यांनी 100 तास काम करत असल्याचे म्हटले आहे. दीपक शेनॉय यांनी एक्स अकाऊंटवर आपल्या कामकाजासंबंधी लिहिले आहे. मी माझ्या आयुष्यात 100 तास करत आलेलो आहे. यातील सर्वात जास्त तास हे मी ज्या वेळी एक सामान्य कर्मचारी होतो, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करून जोरदार विरोध केला आहे. परंतु, त्यांनी असेही म्हटले की, कामाचे तास वाढवण्याची गरज नाही. जे लोक आनंदाने काम करतात त्यांनी करायला हरकत नाही, असे ते म्हणाले. खरं म्हणजे कर्मचाऱ्यांचे काम असते ते फक्त चार ते पाच तासांचे असते, परंतु कोणते तास आहेत, यासंबंधी त्यांनी स्पष्ट सांगितले नाही.
कर्मचाऱ्यांनी घडय़ाळाकडे पाहून काम करू नये
मीटिंगच्या वेळा माझ्या कामात जोडणे माझ्यासाठी अवघड आहे. मीटिंगमध्ये कामापेक्षा जास्त वेळ जातो, परंतु मी ज्या वेळी काम करतो ते पूर्ण ताकदीनिशी करतो. लोकांनी आपल्या कर्तव्यानुसार काम करायला हवे तर यश मिळू शकेल. घडय़ाळाकडे पाहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यश मिळत नाही, असेही ते म्हणाले. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवडय़ातून 70 तास काम करण्याची सूचना केल्यानंतर लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी त्यांच्यापुढे जात आठवडय़ातून किमान 90 तास काम करावे, असा अजब सल्ला दिला होता. त्यावर अनेकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.