ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रूपये शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाल्मीक कराडने सोलापूर जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दिलीप नागणे यांनी हा आरोप केला आहे. या फसवणुकीबाबत त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने भरीव अनुदान जाहीर केल्याने सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यादेवी नगर, सांगली या भागातील 140 शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केली. एका तोडणी यंत्राची किंमत साधारण 90 लाख ते एक कोटी रुपये इतकी आहे. या खरेदीवर राज्यशासनाने 40 टक्के अनुदान म्हणजे सुमारे 36 ते 40 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते.
40 लाख अनुदान हवे असेल तर 8 लाख रुपये द्यावे लागतील अशी अट वाल्मीक कराडने या शेतकऱ्यांना घातली होती. अनुदानाचे लाभार्थी असलेल्या या 140 शेतकऱ्यांना एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आले. तिथे सर्व यंत्र मालकांकडून प्रत्येकी 8 लाख गोळा केले. गोळा केलेली रक्कम कराडला देण्यासाठी शेतकरी पनवेल येथील देवीश रेसीडेंन्सी येथे गेले. तत्पूर्वी त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यांनी अनुदान देण्याबाबत योग्य ते सहकार्य करु असे आश्वासन दिले.
सह्याद्री अतिथी गृहावर मुंडे यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवाय वाल्मीक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पालवे हे पैसे घेतानाचा फोटो सोशल मीडियावर झळकतो आहे. कराड याचा रोज एक कारनामा समोर येत असून ऊस यंत्र मालकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा कारनामा आता उघड झाला आहे. आपल्याला अनुदान नाही तर किमान आपले लाटलेले 8 लाख तरी परत मिळतील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.