‘सरकारचा जावई असल्यासारखं वाल्मिकला वागवलं जातंय’, असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र वाल्मीकी कराड याच्यावर मकोका लावण्यात आला नाही. यावरच भाष्य करताना ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्या असं म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, ”सात आरोपींवर आज मकोका लावून कुठला तिर मारला या शासनाने? हे सगळं प्रकरण पहिल्या दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. या सात जणांनी संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांची हत्या केली. मात्र त्यांच्या मागे आणखी एक व्यक्ती होता, जो व्हिडीओ बनवून हे सगळं बघत होता. या सात जणांवर मकोका लावण्यात आला, मात्र आठव्याला (वाल्मीकी कराड) यातून का वगळण्यात आलं? कारण त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त आहे की, त्याच्यावर कारवाई करण्याची शासन आणि गृहमंत्रालयाची हिम्मत नाही आहे.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, ”हे सगळं प्रकरण समजून घ्यायचं असेल तर, शिंदे नावाचे एक अधिकारी होते, जे अवादा या कंपनीसाठी काम करत होते. त्यांनी मे महिन्यापासून तक्रार केली होती की, त्यांना धमकी दिली जात आहे. त्यांना वारंवार तुमचे प्लांट बंद करा म्हणून धमकी दिली जात होती. त्यांना हातपाय तोडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. याशिवाय एकदा त्यांचं अपहरणही करण्यात आलं होतं. याशी संबंधित एक एफआयर देखील आहे. यातच मे महिन्यापासून वाल्मीकी कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नावे येत होती, मग त्यावेळी त्यांच्यावर मकोका लावून कारवाई का करण्यात आली नाही? मे महिन्यापासून डिसेंबरपर्यंत पोलिसांनी वेळ वाया घालवला नसता तर, आज संतोष देशमुख जिवंत असते. ”