Kho-Kho World Cup 2025 – महाराष्ट्राची लेक करणार हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व, वाचा सविस्तर…

नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय खो-खो वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानी संघाच्या कर्णधार पदाची मोठी जबाबदारी बीडच्या प्रियंका इंगळेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बीड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून प्रियंकावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

बीड तालुक्यातील कळंबआंबा या गावातील रहिवासी असलेल्या हनुमंत इंगळे आणि सविता इंगळे यांच्या पोटी तिचा जन्म झाला. इंगळे दाम्पत्याला प्रणय आणि प्रियंका अशी दोन मुले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना प्रियंकाने खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं. तिची खेळाची आवड पाहून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या खो-खो प्रशिक्षणाला सुरुवात झाली. दरम्यान, रोजगाराच्या निमित्ताने इंगळे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक झाले. या काळात प्रियंकाने प्रचंड मेहनत घेत आपल्या खेळाचा आलेख सतत उंचावत नेला. चपळ असलेल्या प्रियंकाने अनेक वेळा आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. खेळातील दर्जेदार कामगिरीमुळेच तिला सात वेळा हिंदुस्थानच्या संघात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

हिंदुस्थानकडून खेळताना प्रियंकाने अनेक वेळा संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला आहे. तिच्या खेळाची दखल घेत तिला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील राणी लक्ष्मीबाई व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये तिचा खेळ पाहण्यासाठी इंगळे कुटुंबासह महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमी आतूर झाले आहेत. सध्या ती दिल्ली येथे जोरदार सराव करत आहे. त्याचबरोबर प्रियंका पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर सुद्दा कार्यरत आहे.

आंतरराष्ट्री खो-खो वर्ल्डकपसाठी महिलांचा संघ

प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, सुभाश्री सिंघ, चैत्रा आर, निता देवी, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, नाझिया आणि मोनिका या 15 खेळाडूंचा संघात समावेश आहे. तसेच प्रशिक्षकपदाची जबाबदारी प्राची वाईकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.