Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा

दापोली तालुक्यातील दमामे (वडाची वाडी) येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून गरिब शेतकऱ्याच्या 6 बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दापोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत पसरवली आहे. त्यामुळे गायी, वासरे, गुरांसह बकऱ्यांना बिबट्याने लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शुक्रवारी 10 जानेवारी ते शनिवारी 11 जानेवारी दरम्यान मध्यरात्री दमामे (वडाची वाडी) येथील रहिवासी अंबाजी हरावडे यांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने 10 बकऱ्यांपैकी सहा बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. या बकऱ्यांपैकी एका बकरीला घेऊन जाण्यात बिबट्या यशस्वी झाला आहे. सकाळी बकऱ्यांना पाला चारण्यासाठी गोठ्यात गेले असता सुभाष हरवडे यांना धक्काच बसला. घडल्या घटनेची खबरदारी घेऊन वन विभाग प्रशासनाने पिंजरा लावून बिबटयांना पकडून दुर अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासात सोडून त्याच्या सुरक्षिततेसह येथील रहिवाशांमध्ये निर्माण झालेली भिती दुर करावी, अशी मागणी दमामे तोमोंड गावचे उपसरंपच गंगाराम हरावडे यांनी केली आहे.