Mumbai Metro Line – 7 आणि 2A या दोन्ही मार्गांवर पूर्ण गतीने संचालनासाठी CCRS कडून मंजुरी

मुंबईकरांसाठी वाहुतकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो लाईन 7 (रेड लाईन) आणि मेट्रो लाईन 2ए (यलो लाईन) या दोन्ही मार्गांवरील पूर्ण गतीने मेट्रो संचालनासाठी रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (CCRS) यांनी मंजुरी दिली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दोन्ही मार्गिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विशेष करून 50 ते 60 किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता 80 किमी प्रति तास या पूर्ण क्षमेतेने मेट्रो धावणार आहेत.

दोन्ही लाईन्स MMRDA द्वारे चालवल्या जातात आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मेट्रो लाईन 2ए दहिसर ते डीएन नगर हे 18.6 किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर 17 स्थानके आहेत. मेट्रो लाईन 7 अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे 16.5 किमीचे अंतर असून या मार्गावर 13 स्थानके आहेत. या दोन्ही लाईन्स रोज 2.5 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा प्रदान करतात आणि आतापर्यंत एकूण 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी या मेट्रो मार्गांवर प्रवास केला आहे.

एमएमआरडीएने चालकविरहित ट्रेन सेट्स, सीबीटीसी सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून मुंबईला सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम मेट्रो नेटवर्क देण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता केली आहे.