उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्थानकावर छत कोसळलं, अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करताना अचानक छत कोसळले असून त्याखाली 20-25 मजूर अडकले आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि इतर कामगारांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

आतापर्यंत 6 मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची तात्काळ दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नौज रेल्वे स्थानकावरील इमारतीमध्ये सुशोभीकरणाचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक छत कोसळले आणि त्याखाली मजूर अडकले. यामुळे एकच खळबळ उडाली. रेल्वे प्रशासन, इतर कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही मजुरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.