वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणीतील प्रमुख आरोपी आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचा मुलगा सुशील याच्यावर सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. शस्त्राचा धाक दाखवत मारहाण आणि लुबाडणूक केल्याबद्दल ही तक्रार दाखल झाली आहे.

सुशीलने व्यवस्थापकाला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आणि दोन ट्रक, कार, परळी येथील भूखंड जबरदस्तीने ताब्यात घेतले, असा आरोप या व्यवस्थापकाच्या पत्नीने केला आहे. याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने तिने न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच आपल्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे.

वाल्मीक कराड हा सध्या खंडणी प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराड हाच सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. या हत्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कराड हा निकटवर्ती आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.