>> प्रणव पाटील
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिह्यात दांडेलीचं घनदाट अरण्य आहे. या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. हळियाळ या तालुक्याच्या ठिकाणावरून आम्हाला दांडेलीतल्या सिद्दी आदिवासींच्या पाडय़ावर जायचं होतं. हळियाळ शहरात आपल्याला बाजारात, बसमध्ये बहुतांश लोक मराठीत बोलताना दिसतात. परंतु सगळे फलक मात्र कानडीत दिसतात. दांडेलीतही कन्नड बरोबरीनेच मराठी आणि कोकणी भाषा बोलली जाते असं वाचलं होतं. दांडेलीच्या जंगलात शिरताच रस्त्यावर कोह्याचं दर्शन झालं. रस्त्यात आम्हाला मिन्गेल सिद्दी हा तरुण कार्यकर्ता भेटला. गप्पांच्या ओघात मिन्गेल म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुमच्या महाराष्ट्रातून आलेल्या धनगरांनी इथे रायपट्टण परत वसवलं आहे. इतिहासकाळात या प्रदेशावर बनवासीच्या कदंब राजाची सत्ता होती. या कदंब राजाची राहायची जागा दांडेलीत जिथे होती तिथे एक नगर उभं राहिलं. त्या नगराला रायपट्टण म्हणजे राजाची नगरी असं नाव पडलं. इतिहासात कदंब हरवलं तसं काळाबरोबर रायपट्टणही लुप्त झालं.
भूतकाळाच्या पटलावरून रायपट्टण या गावाला पुन्हा भेट द्यायचं ठरवलं. गर्द जंगलातून मध्येच उघडय़ावर असलेलं रायपट्टण गाव लागलं. अतिशय आखीव-रेखीव असणारं ते गाव डंगे धनगरांनी काही दशकांपूर्वीच वसवलेलं होतं. हे डंगे धनगर म्हणजे सह्याद्रीच्या खोऱयात दुर्गम जागी डोंगरात राहणारे पशुपालक. डोंगरी धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्या घरांना कुंपण घातलेलं नसतं. परंतु रायपट्टणमध्ये जागोजागी बांबूच्या तट्टय़ांनी सुरेख कुंपण घातलेलं होतं. रानटी प्राण्यांचा वावर आजूबाजूलाच असल्यामुळे ही योजना केली होती. थंडीच्या दिवसांत हत्ती स्थलांतरित होताना या प्रदेशात धूमाकूळ घालतात. इथल्या पट्टेरी वाघाचा संचार दांडेली ते साताऱ्यातल्या चांदोलीच्या जंगलापर्यंत असतो.
या धनगरांच्या घरांचं वैशिष्टय़ म्हणजे स्थानिक गावांमध्ये दिसतात त्याप्रमाणे न भाजलेल्या विटांची घरं. त्या पिवळसर राखाडी विटांची सुरेख बांधणी जागोजागी दिसत होती. दुसरं वैशिष्टय़ म्हणजे या धनगरांच्या घराच्या पडवीत गुरांचा गोठा नसून तो घराशेजारी स्वतंत्रपणे दगडमातीत बांधलेला दिसतो. या भल्यामोठय़ा गोठय़ांची रचना रानटी प्राण्यांमुळे बंदिस्त असते. या प्रदेशात पाऊस असतो. त्यामुळे साधारण तीन फुटी उंचीच्या चौथऱ्यावर घर बांधलं जातं. या घरांना स्थानिक नक्षीच्या रेखीव चौकटी, दरवाजे आणि खिडक्या असतात. या धनगरांचा गायी आणि म्हशी पाळणे हा मुख्य व्यवसाय असला तरी भात शेती या भागात होते.
रायपट्टणमध्ये बहुतेक साताऱयाच्या पाटण खोऱयातून आलेल्या धनगरांची वस्ती आहे, ज्यात शिंदे, येडगे, फोंडे, झोरे, लांबोटे, गावडे इत्यादी आडनावांच्या पंचाहत्तर कुटुंबांची घरं आहेत. त्याशिवाय दहा-बारा सिद्दी आदिवासी राहतात. गावाच्या प्रमुखाला गावडे म्हणतात. रायपट्टणमध्ये पंढरमिसे आडनावाच्या कुटुंबाकडे ही गावडकी अर्थात पाटीलकी होती. गावात दसऱ्याला हे धनगर त्यांचा वैशिष्टय़पूर्ण पांढरा पोशाख, पागोटं, पायात चाळ आणि तलवार घेऊन नृत्य करतात. पंढरपूरचा विठोबाला ते आपला पूर्वज आणि कुलदेव मानतात.
गावातील लोकांनी कदंब राजवटीविषयी सांगितलं की, जंगलात जागोजागी पडलेली मंदिरं आहेत, अनेक ठिकाणी खंडित मूर्ती दिसतात, काही ठिकाणी दगडाचे ढीग आहेत तिथे राजचा राजवाडा होता असं म्हणतात. या परिसरात मृत सैनिकांची स्मारक शिल्पं असणारे वीरगळ जंगलात आहेत. अनेक ठिकाणी माणसाच्या उंचीची शिल्पं पडून आहेत. गावातच एक फेरफटका मारून संध्याकाळी गुरांना घेऊन घरी चाललेल्या धनगरांना भेटून आम्ही निघालो. शेकडो वर्षे लुप्त झालेलं रायपट्टण पुन्हा गजबजलं होतं आणि इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.