सिनेविश्व – नवीन वर्षात ‘भुतां’ना घाबरू नका!

>> दिलीप ठाकूर

मागच्या वर्षी स्त्री 2, मुंज्या असे हॉरर कॉमेडी चित्रपट यशस्वी झाले नि चित्रपटसृष्टीला जणू यशाचा हुकूमी मंत्र सापडला. भुताची गोष्ट अन् गंमतीजमतीचा मालमसाला जमला की पिक्चर हिट! ही भुताची गोष्ट मल्टीप्लेक्समध्ये आणि ओटीटीवरही अनुभवणे रोमांचक. चित्रपट रसिकांना हवे असलेले सहज सोपे मनोरंजन असे धमाल भूतपट देतात, तर मग दुसरे काय हवे?

चित्रपटाच्या जगात यश हेच मोठे चलनी नाणे. ‘एक पिक्चर सुपरहिट होना मंगता है.’ मग त्याच पठडीतील चित्रपट बनवायची जणू ‘फॅक्टरी’ निर्माण होते. 2024 मध्ये आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि रितेश देशमुखची भूमिका असलेला ‘काकुडा’ हा भूतपट सुपरहिट ठरल्यावर हा फंडा चर्चेत आला. असे धमाल भूतपट पाहायची जणू आवड निर्माण झाली. त्यात स्त्राr 2, मुंज्या असे हॉरर कॉमेडी चित्रपट यशस्वी झाले नि चित्रपटसृष्टीला जणू यशाचा हुकूमी मंत्र सापडला. ही गोष्ट भुताची, पण त्यात मालमसाला गंमतीजमतीचा.

फार पूर्वी म्हणजेच कृष्णधवल चित्रपटाच्या काळातील चित्रपटातील भुते ही फारच घाबरवणारी असत. ती भीती दूर व्हायची ती त्यातील सुरेल गीत संगीताने. महल, बीस साल बाद, कोहरा या चित्रपटांतील संगीत साठ वर्षांनंतरही पुनः पुन्हा ऐकत राहावे असे श्रवणीय. सत्तरच्या दशकात रामसे बंधूंच्या भूतपटातील अक्राळविक्राळपणा पाहूनच भीती वाटायची. त्याही मनोरंजनाचा छोटय़ा शहरात, ग्रामीण भागात हुकूमी प्रेक्षकवर्ग असल्याने रामसेबंधूंनी भूतपटाची मालिकाच लावली.

मोहन भाकरी नावाच्या निर्माता दिग्दर्शकानेही बरेच भूतपट निर्माण करीत त्यात स्पर्धा निर्माण केली. अरुणा विकास दिग्दर्शित ‘गहराई’ हा चित्रपट भूत खरंच आहे की ती भाकडकथा आहे, यावरचा चित्रपट खूपच गाजला. रामगोपाल वर्माचा ‘भूत’ त्याची मांडणी आणि आधुनिक साऊंड सिस्टीमचा प्रभावी वापर केल्याने थरारक ठरला.

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोरच्या भूतपटात भास-आभासाची गंमत आहे. ‘मुंज्या 2’चा पुढचा भाग महामुंज्या, स्त्राr चित्रपटाचा पुढचा भाग स्त्राr 3, रुही, शक्ती शालिनी, भेडिया 2, चमुंडा, दुसरा महायुद्ध (या नावाचा कॉमेडी हॉररपट येतोय), थमा (या चित्रपटात आशुतोष खुराना, रक्षिता मंदाना, नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या भूमिका आहेत) असे अनेक हॉरर भूतपट आपल्यासमोर येत आहेत. प्रेक्षकांची आवड (की मागणी) तशी चित्रपट निर्मिती (की पुरवठा) हे तर चित्रपटसृष्टीचे अलिखित नियम.

कौतुक करायला हवे ते, पटकथा लेखकांचे! ते भुताची नवीन गोष्ट निर्माण करताहेत. कोणी शहरात तर कोणी दूरवरच्या खेडय़ापाडय़ातून भुताचा वावर दाखवतात आणि त्याच भुताला पाहून, न पाहून घाबरणारी पात्रे पाहून प्रेक्षकांना छान हसायला येतं. शहरी युवक-युवती खेडय़ात सहलीला जातात आणि भुताची गोष्ट सुरू होते हे ठरलेलं. पुढची गंमत, गडबड गोंधळ जमला तर पिक्चर हिट. तेही मल्टीप्लेक्समध्ये आणि ओटीटीवरही. दोन्हीत साऊंड सिस्टीमचा घेता येत असलेला अनुभवही रोमांचक. अशा भूतपटांना चित्रपट विश्लेषक, अभ्यासक वगैरे फारसे कोणी गंभीर दखल घेत नाहीत. रसिकांना हवे असलेले सहज सोपे मनोरंजन असे धमाल भूतपट देतात, तर मग दुसरे काय हवे?

[email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)