टीएमटीच्या कोणत्याही बसमध्ये तुम्ही डोळे झाकून प्रवास करीत असाल तर जरा जपून.. कारण बसेस चालवणाऱ्या चालकांची नजरच कमजोर झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 30 टक्के चालकांना दृष्टीदोष झाला असून आठ टक्के जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे. महागड्या वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावत असतानाच या गाड्या चालवणाऱ्या चालकांचे डोळेदेखील सक्षम असणे अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात टीएमटी बसचालकांची नजर कमजोर झाल्याने प्रशासनदेखील चिंतेत आहे. अशा कम नजरवाल्या चालकांवर कोणते उपचार करायचे याचा विचार प्रशासन करीत आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून रोज लाखो नागरिक टीएमटीच्या बसने प्रवास करतात, पण बसेसची संख्या अपुरी असल्याने त्यांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ठाणे शहरात टीएमटीच्या ४०० हून अधिक बसेस धावत असून बसचालक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत की नाही याची सतत तपासणी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरटीओ, फोर्टिस हॉस्पिटल व टीएमटी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदनगर बस आगारामध्ये नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. त्यात ३० टक्के बसचालकांची दृष्टी कमजोर असल्याचे दिसून आले.
■ अस्त वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक असते. मात्र अनेक चालक डोळ्यांची तपासणी करण्याकडे कानाडोळा करतात.
■ रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त चालकांच्या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी टीएमटीच्या 101चालकांच्या डोळ्यांची तपासणा केली.
दुर्लक्ष केल्याचा परिणाम
डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम नजरेवर होत असून, डोळ्यांच्या बाबतीत चालकवर्ग काहीसा बेफिकीर आल्याचे तपासणी शिबिरात दिसून आले आहे. आनंदनगर बस डेपोत केलेल्या नेत्रतपासणी शिबिरात ३० चालकांना दृष्टीदोष तर आठ जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे. चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. यापुढेही बस चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.