परीक्षण – मंदिरवैभवाची परिक्रमा

>> डॉ. लीना रस्तोगी

‘गा भारा’ हे सर्वेश फडणवीस या तरुण लेखकाचे पहिलेच पुस्तक. ‘तरुण भारत’ (सोलापूर)च्या ‘आसमंत’ पुरवणीतील 53 लेखांची ही माला पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आहे. भाषा इतकी ओघवती आहे की, एकदा पुस्तक हातात घेतले की ते खाली ठेववतच नाही.

पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत सूचक आहे. वनश्रीने नटलेल्या परिसरात एक देवालय. भगवंत खुल्या दिलाने भक्तांना पोटाशी धरतो हे सूचित करण्यासाठी त्याचे द्वार पूर्णपणे उघडे. परंतु गर्भगृहात (गाभाऱयात) मात्र झगझगीत प्रकाश नाही, जवळपास अंधारच! त्याचे स्पष्टीकरण लेखकाच्या मनोगतात आढळते. ‘अंधाऱया गर्भगृहात मंद दिव्याच्या सौम्य प्रकाशात दिसणारी मूर्ती किंवा शिवलिंग हे शरीराच्या आतल्या अंतरात्म्याचे प्रतीक.’ हे देगलूरकरांचे शब्द उद्धृत करून लेखकाने स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. हे मुखपृष्ठ लेखकाच्या पित्यानेच साकारले आहे हे उल्लेखनीय!

प्रस्तुत पुस्तकात एकूण 53 देवळांचा परिचय आहे. त्यापैकी 43 महाराष्ट्रातील, 3 गोव्यातील आहेत. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 2 आणि कर्नाटक, तेलंगणा व ओडिसा येथील एकेक देवालयाचा समावेश आहे. समर्पक छायाचित्रांनी प्रत्येक लेख सजलेला आहे.

बोलके मुखपृष्ठ आणि समर्पक छायाचित्रे प्रस्तुत पुस्तकाचे बाह्य सौंदर्य खुलवितात हे तर खरेच, पण अधिक महत्त्वाचे आहे. त्यातील अंतरंग! त्यातून लेखकाची मूलग्राही (फक्त पल्लवग्राही नाही) दृष्टी प्रकट होते. त्या दृष्टीचे विविध दृष्टिक्षेपही मोठे मनोवेधक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकाचे शीर्षक! लेखकाच्याच शब्दात सांगायचे, तर “गाभाऱयात ‘आत’ जायचे असते. सृष्टीला चालना देणारे परमोच्च तत्त्व तेथे वास करते. तेथे नतमस्तक होऊन त्या तत्त्वातील अक्षम्य ऊर्जा घेत आपण बाहेर पडतो.’’लेखांची शीर्षके हे दुसरे वैशिष्टय़! प्रत्येक मंदिरातील आराध्य देवतेच्या विषयीची काव्यमय आणि समर्पक शीर्षके त्या त्या लेखाला वेगळीच आभा देतात.

मंदिर म्हणजे फक्त एक इमारत नसते. त्या त्या दैवताविषयीची आस्था, त्यातील शिल्पकला, ऐतिहासिक/ पौराणिक/भौगोलिक संदर्भ, स्थापत्यशैली (हेमाडपंती, द्रविड इ.) या सर्वांचे मधूर मिश्रण म्हणजे देवालय. पुस्तकाच्या तरुण लेखकाने या सर्व बाबींची नोंद घेतली आहे आणि तीही रसिकतेने. उदा. माहूर, वाशीम, गाणगापूर, अदासा, बहिरम इ. शब्दांची व्युत्पत्ती अर्थात कवळे, तिरहुत किंवा मंगेश या शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल मतभेदाला वाव आहे, पण तरीही लेखकाच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक करायलाच हवे.

ही डोळस जिज्ञासा लेखकाला मंदिराविषयीचे ऐतिहासिक वा पौराणिक संदर्भ देण्यास भाग पाडते. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वाशीमचे बालाजी मंदिर, अमरावतीची एकवीरा, पंढरपूरचा विठोबा, पुण्यातील भीमाशंकर सज्जनगडचे श्रीरामदास स्वामी संस्थान, गोव्यातील शांतादुर्गा इ. अनेक मंदिरांचे ऐतिहासिक संदर्भ येथे आढळतात. तसेच मेहकरचा शारंगधर अदासा येथील शमीविघ्नेश (71) तेलंगणातील ज्ञानसरस्वती (79), अंत्री (यवतमाळ जिल्हा) येथील नृसिंह मंदिर (124), पारशिवनीची महालक्ष्मी (132), रामटेकचे कोटेश्वर मंदिर (177) अशा अनेक अप्रसिद्ध मंदिरांचाही सुरेख परिचय प्रस्तुत पुस्तकात आहे.

तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, मेहकरचा बाळाजी यांचे दर्शन अनेकांनी घेतले असेल. तरीही भवानीमातेचा निद्राकाल, अंबाबाईचा किरणोत्सव, बालाजीचे 180 अंशांवरून दिसणारे स्मितहास्य यांचा अनुभव प्रत्येक दर्शनार्थीने घेतला असेलच असे नाही. प्रस्तुत पुस्तक वाचल्यावर ती एक नवीन माहिती आपल्याला मिळते.

अशा प्रकारच्या अनेक वैशिष्टय़ांनी नटलेल्या या पुस्तकाची भाषा मात्र विद्वज्जड नाही. ती वाचकाला घरबसल्या हसत-खेळत सर्व मंदिरांची सहल घडवते.

(लेखिका संस्कृत विदुषी आहेत.)

गाभारा

लेखक ः सर्वेश फडणवीस

प्रकाशक ः बुकगंगा पब्लिकेशन

पृष्ठे ः 246  मूल्य ः 350 रुपये