अभिप्राय- संस्कारी बालकविता

>> सुधाकर वसईकर

संस्कारक्षम मुलं सदृढ समाज आणि देश उभारणीची नीव असतात. बालमनाला निसर्गाची ओढ आणि त्याचे नाना विविध रंग, तसेच चराचर सृष्टीतील प्राणी पक्ष्यांची ओढ आणि कुतूहल असते. बालक मोठय़ांचे अनुकरण, नक्कल करीतच आपले सुरवातीचे व्यक्तित्व घडविण्याचा यत्न करतो. बाल विश्व निरागस आणि कुतूहलाने भारित असते. अशा ओल्या गोळ्याला आकार देत, हवी ती मूर्ती घडविणे सहज, सुलभ असते. अरुण देशपांडे कवितेतून बाल मनावर तेच ‘संस्करण’ करतात. सुसंस्कारातून कुटुंब व्यवस्थेत वैयक्तिक, सामाजिक जीवनात सर्वोत्तम व्यक्तित्व साकारता येते.  हे काम अतिशय जोखमीचे आणि खडतर असते. कारण मोठय़ांना लहानग्यांच्या पातळीवर, कधी त्यांच्या वयाचे होत, त्यांचे भावविश्व समजून घेत ही तारेवरची कसरत करावी लागते. लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. गोष्टी नुसत्या सांगण्याशिवाय त्याला कलात्मकतेची जोड दिली, वेगळ्या पद्धतींने, अधिक रंजक करून सांगितल्या तर मुलांमध्ये कुतूहल निर्माण होते. असाच अभिनव प्रयोग, कवी अरुण देशपांडे यांनी आपल्या “माझे आबा आज्जी“ बालकविता संग्रहात उण्यापुऱया 26 बालकवितांमधून केला आहे. गोष्टस्वरूप या बालकवितांना अंगीभूत लय आहे, नाद आहे. त्या बालकांच्या ओठावर सहज रूळव्यात, गुणगुणता याव्यात अशा आहेत. बालसुलभ मनाला सहज भुरळ घालून, बालमनाचं मनोरंजन करणाऱया आहेत. सप्तर्षी प्रकाशनाने हा बालकवितासंग्रह प्रकाशित केला असून, 38 पानांच्या बालकवितासंग्रहास जितेंद्र साळुंके यांनी सजविले आहे. त्यांनी साकारलेल्या आजी, आजोबा आणि नातूच्या मुखपृष्ठासहीत आतील पानांवर रेखाटलेली कवितार्थानुरूप चित्रे लहानग्यांचे लक्ष तर वेधून घेतात; तद्वतच संग्रहाची रंगत वाढवितात.

 नातेविषयक, सण संकृती विषयक, पर्यावरण सजगता, देशभक्ती पर, अध्यात्मिक बैठक तयार करू पाहणारी अशी संग्रहातील कवितांची ढोबळमानाने वर्गवारी करता येईल. पहिल्याच ‘आई’ कवितेत, तिन्ही त्रिकाळी, उन्हातही स्नेह सावली देणारी आई आपल्याला भेटते. लहानांचे बोट धरून बागेत घेऊन जाणारे, त्यांना भेळ खाऊ घालणारे, लहान होऊन त्यांच्याशी बोबडे बोल बोलणारे, मित्रा सारखे वागणारे, बागेत घेऊन जाणारे, आबा आज्जी “माझे आबा आज्जी “ या शीर्षक कवितेत भेटतात. या लहान्यांची समजूत घालता घालता त्यांना देशभक्तीपर शिकवणही देतात. आपल्या भारत मातेचे रक्षण करणाऱया सैनिकांचे आपण प्रथम कौतुक केले पाहिजे. आपण सारे एक आहोत ही भावना बाळगून, प्रत्येकाने देश सेवेसाठी वाहून घेतले पाहिजे, असा देशभक्तीपर मौलिक संदेश, “भारतमाता की जय, देशप्रेम, तिरंगा प्यारा, स्वातंत्रदिनी, महाराष्ट्र माझा’’ आदि कवितेतून देतात.

देश घडविण्यात राष्ट्र पुरुषांचे मोठे योगदान आहे हे पटवून देणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ‘बापूजी‘ कविताही बालमनावर सत्य, अहिंसा, शांतीचा संदेश बिंबविणारी आहे.

सणासुदीला मिळालेली सुट्टी आणि त्यादिवशी खायला मिळणारे चविष्ट, गोड पदार्थ यामुळे बाळगोपाळांच्या आनंदाला उधाण आलेलं असते. ऋतूमानाप्रमाणे येणाऱया सणांचं महत्व आणि त्यादिवशी बनविल्या जाणाऱया गोड-धोड चविष्ट पदार्थांची लज्जतदार ओळख, सण संक्रांतीचा, गणपती बाप्पा मोरया, विजयादशमी, दिवाळीची मज्जा आदी कवितेतून गमती-जमतीतून करुन दिली आहे. उत्सवी सणात एकत्र येणाऱया मित्र मंडळीत छान गप्पा रंगतात, त्यामुळे एकमेकांची दुःख विसरली जातात. माणसामाणसांत सदभावना निर्माण होऊन, नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते आणि एक निरोगी समाज निर्माण होतो याचे महत्व या कवितांमधून अधोरेखित होते.

माझे आबा आज्जी

 कवी ः अरुण देशपांडे  n प्रकाशक ः सप्तर्षी प्रकाशन

 पृष्ठ ः 38 n मूल्य ः 60/-