दिल्लीमध्ये बसलेल्या रंगा आणि बिल्लाला खूश करण्यासाठी खोके सरकार महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला स्थलांतरित करीत आहे. खालापूरमधील पारले बिस्कीटची कंपनी बंद करून हे युनिट गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. मात्र खोके सरकारचा हा डाव आम्ही हाणून पाडणार, असा इशारा कामगार नेते भाई जगताप यांनी दिला आहे.
खालापूर तालुक्यातील खिरकंडी गावातील पारले कंपनीतील 14 कामगारांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची नोटीस दिली आहे. गेल्या 17 वर्षांपासून सुरळीत सुरू असलेले हे युनिट बंद करून ते गुजरातला नेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. या युनिटमधील कामगार स्वतःहून बाहेर पडावेत यासाठी व्यवस्थापन त्यांची छळवणूक करीत आहे. 14 कामगारांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे हाही त्याचाच एक भाग आहे. या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी कामगार नेते भाई जगताप यांनी कंपनीच्या गेटसमोर सभा घेतली. या सभेला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जगताप यांनी सरकारच्या कामगार आणि उद्योगविरोधी धोरणावर जोरदार टीका केली. याप्रसंगी अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष सदानंद चव्हाण, रवींद्र नेमाणे, कोषाध्यक्ष एस.आर. सावंत, महादेव भारकड आदी उपस्थित होते.
कंत्राटी कामगार गुलाम नाही
कंत्राटी कामगार गुलाम नसतो, तो कायमस्वरूपी होऊ शकतो, हे मस्को कंपनीमधून दाखवून दिले आहे. कंपनीत काम करताना पक्षाचा लेबल लावू नका. युनियन झाली म्हणून कंपनीत दादागिरी करू नका. आपले काम प्रामाणिकपणे करून प्रोडक्शन वाढवा असा सल्ला भाई जगतात यांनी कामगारांना दिला आहे.