उमेद – बेघर मुलांमध्ये ‘उमेद’ जागवणारा संकल्प!

>> सुरेश चव्हाण  

आईवडिलांची बळजबरी, भीतीपोटी सिग्नल, रेल्वे स्टेशन, मॉल, अगदी रस्त्यावर चालतानाही कित्येक लहान मुलं फुगे, गजरे, खेळणी विकताना तसंच कचरा गोळा करताना, भीक मागतानाही दिसतात. अशा मुलांसाठी मंगेशी मून यांनी 2015 पासून मुंबईतूनचउमेद संकल्पसंस्थेअंतर्गत कामाला सुरुवात केली. वर्ध्यातरोठाया त्यांच्या वडिलांच्या गावी अकरा एकरांमधे बांधलेल्या वसतिगृहात अशी सत्तर मुलं आज पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत.  

ग्नल, रेल्वे स्टेशन, मॉल या ठिकाणी आपल्याला लहान-लहान मुलं फुगे, गजरे, खेळणी विकताना तसेच भीक मागतानाही दिसतात. त्यांचे पालक त्यांच्या आसपास कुठेतरी असतात. मुलांनी भीक मागण्यासाठी त्यांच्या मागे त्यांच्या पालकांचा ससेमिरा चालू असतो. कधी-कधी या मुलांच्या पाठीत धपाटे घालून त्यांना जबरदस्तीने भीक मागायला लावली जाते. ही मुलं त्यांची स्वत:ची असतातच असे नाही, तर काही दुसऱयांची मुलं पैसे देऊन दिवसभरासाठी घेतली जातात. अशा मुलांसाठी मंगेशी मून यांनी 2015 पासून मुंबईतूनच कामाला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, त्यांचे आई-वडील मुलांना शाळेत न पाठवता, कचरा गोळा करायला, छोटय़ा-मोठय़ा चोऱया करायला, भीक मागायला त्यांना प्रवृत्त करतात व त्यांनी आणलेल्या पैशातून दारू पिऊन, जुगार खेळून हे पैसे उडवतात. परत दुसऱया दिवशी पुन्हा त्यांना तेच करायला लावतात. मुलं आई-वडिलांचा मार खाण्याच्या भीतीने पुन्हा तेच करतात. पुढे त्यांना त्याची सवय लागते. ही मुलं मोठी झाल्यावर चोऱयामाऱया, रेल्वेत पाकीटमारी करणे हे उद्योग सुरू करतात.

मुंबईत सुरू केलेलं काम जागेअभावी तसेच ही मुलं तिथे टिकणार नाहीत हे ओळखून त्यांनी वर्ध्याला वडिलांच्या ‘रोठा’ या गावी असलेल्या अकरा एकर जमिनीत ‘उमेद संकल्प’ या संस्थेची सुरुवात केली. त्यासाठी त्या मुंबईतून वर्ध्याला आल्या. पुरेसे पैसे नसताना प्रकल्प सुरू करणे कठीण होते, म्हणून त्यांनी स्वतकडचे सोने गहाण ठेवून व राहत्या घरावर कर्ज घेऊन मुलांसाठी वसतिगृह बांधले. त्यांच्या अकरा एकर शेतीतून जे उत्पन्न येत होतं, ते या मुलांसाठी त्या वापरू लागल्या. सतरा मुलांनी सुरू झालेल्या या वसतिगृहातील बरीच मुलं विदर्भातील होती. 2017 साली या प्रकल्पाची सुरुवात झाली. मग मुंबई, पुणे येथे विदर्भातील अशा मुलांचा त्या शोध घेऊ लागल्या. आज त्यांच्या वसतिगृहामध्ये 70 मुलं शिक्षण घेत आहेत. मंगेशी यांनी या मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त केले व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे वसतीगृह वर्धा शहरापासून लांब असल्यामुळे मुलांना येथून पळून जाता येत नाही. त्यातील मोठी मुलं तिथेच शेतीत काम करून आपल्याला लागणारे धान्य, पालेभाज्या व फळे पिकवायला व पी करायला मदत करतात.

आता हे त्यांना शक्य झालं असलं तरी सुरुवातीला वर्ध्यातील काही शाळांनी या मुलांना प्रवेश द्यायला नकार दिला होता. एका शाळेने तर 35 मुलांना शाळेतून काढून टाकले. त्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागली. या मुलांमुळे आमची इतर मुलं बिघडतील, असं शाळाचालकांचं म्हणणं होतं. पण या मुलांनी अतिशय चांगलं वर्तन व अभ्यासातील प्रगती दाखवून सिद्ध केलं की, तीही इतर मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत. त्यामुळे आता पूर्वीसारखा होणारा विरोध मावळला आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिथे मुलं भीक मागतात त्या सिग्नलवर, कचरा वेचताना मुलं सापडतात. अशा मुलांसमवेत रेल्वे स्थानक, झोपडपट्टय़ा, फुटपाथ, उड्डाणपुलाखाली जिथे त्यांचे पालक राहत असतात त्या ठिकाणी जाऊन मुलांच्या पालकांशी संवाद साधतात. त्यांचा विश्वास संपादन झाल्यावर संस्थेच्या कामाची माहिती त्यांना देऊन ‘मुलांना शाळेत पाठवा, त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय आम्ही करतो,’ हे त्यांना पटल्यावर ते मुलांना संस्थेच्या स्वाधीन करतात. अशी सत्तर मुलं आज वर्ध्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील कोथरुड येथे एका इमारतीतील भाडय़ाच्या जागेत ‘उमेद’चा नवीन प्रकल्प मंगेशी मून यांनी सुरू केला आहे. त्यांची कन्या ऋत्विजा हिने आपल्या कॉलेजच्या शिक्षणासह; वयाच्या 19 व्या वर्षी 35 मुलांची जबाबदारी घेतली आहे. मुलांना शाळेत प्रवेश मिळावा म्हणून ऋत्विजाने त्यांची प्रवेश परीक्षेची तयारी तसेच मुलांचे जन्मदाखले नसताना त्यांची कागदपत्रेही तयार करून घेतली. यामुळे ही मुले डेक्कनच्या बाल शिक्षण मंदिर व विजयाबाई गरवारे शाळेत जायला लागली. त्यांची राहायची व त्यांच्या भोजनाची जबाबदारी ती पार पाडत आहे. यामध्ये तिला तिचा भाऊ ऋताज हा आपलं शिक्षण सांभाळून मदत करत असतो.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 2 लाख 15 हजार 950 इतकी मुले फक्त पारधी समाजाची लोकसंख्या असल्याची माहिती मिळाली. आजही या समाजाला पोलीस गुन्हेगार म्हणून वागणूक देतात. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेतलं जात नाही. त्यामुळे हा समाज भटकंतीचे जीवन जगत आहे. त्यांचे मतदार यादीत नाव, रेशन कार्ड नसणे अशा सुविधांपासून, शासकीय योजनांपासून हा समाज वंचित राहिला आहे. तसेच इतर भटक्या व विमुक्त जमातीबाबतही असे म्हणता येईल. अशा मुलांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत त्या गेल्या. जे उड्डाणपुलाच्या खाली मुलांनी भीक मागून आणलेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह चालवतात. पुरुष मंडळी दारू व जुगारामध्ये पैसे उडवतात. अशांना मंगेशी यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आहे.

मंगेशी यांनी अनेक अडचणींना समर्थपणे तोंड देत प्रकल्पाचे काम यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. समाजापासून दूर असणाऱया या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम थोडय़ाफार प्रमाणात का होईना, करून दाखवले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल मंगेशी यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, ‘लायन्स क्लब’चा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात या प्रकल्पामार्फत मुलांमधील सुप्त गुण ओळखून, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. ही मुलं स्वत सोबतच त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातही नक्कीच सुधारणा घडवून आणतील, असा विश्वास त्यांना वाटतो.

[email protected]