‘हश मनी’ प्रकरणात ट्रम्प यांची जेलवारी टळली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मात्र, न्यायाधीशांनी कोणतीही शिक्षा देण्यास नकार दर्शवला. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना मोठा दिलासा मिळाला. या निर्णयामुळे दोषी ठरवले गेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. न्यायालयाने ट्रम्प यांची सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त सुटका केली आहे. सुनावणीवेळी मॅनहॅटन क्रिमिनल कोर्टात ट्रम्प व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले.

दोषी ठरलेले पहिले राष्ट्राध्यक्ष

गेल्या वर्षी न्यायालयाने ट्रम्प यांना दोषी घोषित केले होते. यानंतर ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनले ज्यांना फौजदारी खटल्यात दोषी ठरवण्यात आले. ‘अमेरिकेतील सर्वोच्च पदाच्या (राष्ट्राध्यक्षांच्या) अधिकारांमध्ये हस्तक्षेप न करता ट्रम्प यांची बिनशर्त सुटका करणे योग्य शिक्षा असेल’, असे न्यायमूर्ती मर्चन यांनी सांगितले. तत्पूर्वी, ट्रम्प यांनी ही एक राजकीय खेळी असल्याचा पुनरुच्चार केला. माझी प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे केले गेले जेणेकरून निवडणुकीत माझा पराभव होईल. पण अर्थातच असे काहीच झाले नाही, असे त्यांनी नमुद केले.