…तर मालमत्ता कराच्या 200 टक्के दंड ; अतिरिक्त पालिका आयुक्तांचा इशारा

मुंबईत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय साधून तातडीने अतिक्रमण निष्कासन कारवाईला वेग द्या. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवर प्रभावीपणे धडक कारवाई करा, तोडक कारवाई करतानाच अनधिकृत बांधकामांना दंडाची नोटीस देणे, दंड आकारणी करण्याची कार्यवाही करावी, अतिक्रमण केल्यास महापालिका कायद्यानुसार मालमत्ता कराच्या 200 टक्के दंड वसूल केला जाईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

मुंबई महानगरातील अतिक्रमण निर्मूलनविषयक कार्यवाहीचा अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयातील सभागृहात आज आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. यावेळी साहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) विनायक विसपुते, साहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे यांच्यासह सर्व संबंधित साहाय्यक आयुक्त, अधिकारी यावेळी उपस्थित होते.