पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही! संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा आक्रोश

एखादे फूल कोमेजले तर ते पुन्हा उमलू शकत नाही. पप्पांच्या हत्येनंतर आमच्या कुटुंबाचीही तीच गत होणार होती; परंतु सगळा समाज आमच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. त्यामुळेच आम्ही न्यायासाठी लढत आहोत. मोर्चात आम्हाला धक्का लागू नये म्हणून समाजबांधव काळजी घेतात. माझ्या वडिलांना ज्या अमानुषतेने मारले, त्यांना किती त्रास झाला असेल? पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही. पण तुम्ही जिथे असाल तेथे हसत राहा… वैभवी देशमुखच्या डोळ्यांत अश्रूंचा वणवा पेटलेला पाहून मोर्चेकऱयांचेही डोळे पाणावले!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज पुतळय़ापासून मोर्चाला प्रारंभ झाला. अंबड चौफुलीवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.

धाराशिव येथे आज आक्रोश मोर्चा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवार, 11 जानेवारी रोजी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजता बार्शी नाका येथील जिजाऊ चौकातून मोर्चाला प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर त्याचा समारोप होणार आहे.

मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना संतोष देशमुख यांची कन्या वैभवी भावूक झाली. वडिलांच्या हत्येनंतर आमचे कुटुंब उन्मळून पडले. आमचा आधारच गेला. त्यामुळे वावटळीत सापडल्यासारखी आमची अवस्था होती. परंतु संपूर्ण समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. एवढेच नाही तर समाजाने आम्हाला लढण्याचे बळ दिले. हे सगळे पाहून क्षणोक्षणी वडिलांची आठवण होते. मोर्चात आम्हाला धक्का लागू नये म्हणून समाजबांधव काळजी घेतात. पण ‘पप्पांना ज्या निर्दयपणाने मारले. त्यांना किती त्रास झाला असेल? पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही…’ असे म्हणताना वैभवीचा बांध फुटला. तिच्या डोळय़ांतील अश्रू पाहून मोर्चेकरीही गहिवरून गेले.