आतापर्यंत ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पॉडकास्टवर आले आहेत. मला ईश्वरानेच पाठवलंय असं म्हणणारे मोदी आता म्हणतात… चुका अपरिहार्य आहेत. माझ्याकडूनही चुका होतात. मीदेखील एक माणूस आहे, देव नाही. झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी त्यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ या मालिकेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीचा टिझर मोदींनी एक्सवर पोस्ट केला आहे. त्यात मोदींचा बदललेला सूर पाहायला मिळाला.
मी कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. काईट हेतूने चुकीचे काम करणार नाही. हा मी माझ्या आयुष्याचा मंत्र बनवला आहे, असे मोदी म्हणाले. जगात जे सुरू आहे ते चिंता करण्यासारखे आहे. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की हिंदुस्थान तटस्थ नाही, आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असे मोदी जगातील वाढत्या युद्धांबाबत म्हणाले.
…अरेतुरे म्हणणारा कोणी मित्र नाही
मी लहान वयात घर सोडले. त्यामुळे शाळेतील मित्रांशी संपर्क तुटला. जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा शाळेतील मित्रांना बोलावले होते. त्यावेळी 35-36 जण आले होते. ते अजूनही माझ्या संपर्कात आहेत, ते माझ्याकडे खूप आदराने पाहतात. आता माझ्या आयुष्यात अरेतुरे म्हणणारा कोणी मित्र नाही. रासबिहारी हे शिक्षक होते ते पत्र लिहायचे तेव्हा ते नेहमी ‘तू’ लिहायचे, परंतु अलीकडेच त्यांचे निधन झाल्याचे मोदींनी सांगितले.
मोदी काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ते ईश्वरी अवतार असल्याचा दावा केला होता. माझा जन्म जैविकदृष्टय़ा झालेला नाही. मला ईश्वरानेच खास शक्ती देऊन त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे. माझ्यातील शक्ती ही साधारण शक्ती नाही. मी पूर्णपणे देवाला समर्पित आहे. मात्र, मला तो देव दिसत नाही. म्हणूनच मी पुजारी आणि भक्तही आहे, असे मोदी म्हणाले होते.