सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे भाजपचे मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी आज पुन्हा सांगलीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सेक्युलर’ हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात नाही; ही घाण काँग्रेसने केली आहे,’ असा जावईशोध लावत विरोधक ‘ईव्हीएम’च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येऊ शकतो, हे बघवत नाही. ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’!’ असे विधान राणे यांनी केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
दरम्यान, मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी ‘आपण मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहोत,’ असा फूत्कार सोडून तमाम मिरजकर मतदारांचा अवमान केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सांगलीत ‘हिंदू गर्जना सभे’चे आयोजन केले होते. यावेळी राणे म्हणाले, ‘मी मतासाठी कधीच त्यांच्या मोहल्ल्यात गेलो नाही. मुंबईतून मला पाडण्याची फिल्डिंग लावली होती; पण मी हिंदू मतांवरच आमदार झालो आहे. विरोधक ‘ईव्हीएम’च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येऊ शकतो हे बघवत नाही. ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’ हा त्याचा लॉँगफॉर्म आहे, तो हिंदूंनी लक्षात ठेवावा,’ असे वादग्रस्त विधान नीतेश राणे यांनी केले.