दररोज होणारा ‘डायरीबॉम्ब’चा स्फोट, सीआयडीच्या प्रश्नांची सरबत्ती, कोठडीतला एकांतवास आणि कारवाईच्या भीतीने वाल्मीक कराडची झोप उडाली आहे. तो कोठडीत नुसत्या येरझाऱ्या घालतो. त्यातच त्याचे डोळे आले आहेत! डोळे येण्याचा आजार हा संसर्गजन्य आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांशिवाय त्याच्या कोठडीत कोणीही जात नाही, मग डोळे आले कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाल्मीक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडीला शरण आला. न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावल्यापासून त्याचा मुक्काम बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे. सुरुवातीला कराडच्या कोठडीचे दरवाजे सताड उघडे होते. कोणीही येऊन त्याला भेटत होते. याचा गवगवा झाल्यानंतर कोठडीचे दरवाजे बंद करण्यात आले.
मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल
संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून, आयोग या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणार आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुनगो यांच्याकडे ही मागणी केली होती.
विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी
खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याची कोठडी संपल्यामुळे त्याला आज केज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तपास अधिकाऱयांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी करून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.