पालिकेचा दणका… प्रदूषणकारी 462 बांधकामे बंद! 1038 ठिकाणांची झाडाझडती

मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेले असतानाही नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचे काम पालिकेने बंद केले आहे. वॉर्ड स्तरावर स्कॉडच्या माध्यमातून 1038 बांधकामांची झाडाझडती घेऊन ही कारवाई करण्यात आली असून मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पर्यावरण उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली.

मुंबईत नोव्हेंबरपासून हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईभर सुरू असलेल्या विविध बांधकामांमधून उडणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईभरातील सुमारे पाच हजार बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी 28 प्रकारचे नियमही पालिकेने जाहीर केले आहेत. मात्र पालिकेच्या तपासणीत अनेक बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने 1 नोव्हेंबरपासून धडक कारवाई सुरू केली आहे.

नोटिसीनंतर 271 जण ताळ्यावर

पालिकेने तपासणी केलेल्या 1038 मधील 856 बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळण्यास बजावले होते. यामध्ये 271 जणांकडून पालिकेने दिलेल्या मुदतीत नियमांची अंमलबजावणी केल्याने त्यांना पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर 191 ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याने बंदी कायम असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा प्लॅन

हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळण्यासाठी मुंबईत 32 ठिकाणी एअर क्वालिटी मॉनेटरिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. खोदकामापासून उडणाऱ्या धुळीमुळेदेखील प्रचंड प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत प्रदूषण कमी होईपर्यंत खोदकामाला बंदी घालण्यात आली आहे. शिवाय बांधकामे 25 फूट उंचीच्या हिरव्या कापडाने, ताडपत्रीने बंदिस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रदूषण कमी होईपर्यंत मुंबईत आरएमसी प्लांट संपूर्णपणे बंदिस्त करण्याची कार्यवाहीदेखील करण्यात येईल.

अशी होते कारवाई

  • पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये स्कॉडच्या माध्यमातून सर्व बांधकामांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्यास पालिकेकडून नोटीस बजावण्यात येते.
  • नोटीस बजावून नियमांची पूर्तता करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाते. या मुदतीमध्ये संबंधित कंत्राटदाराने प्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी केली नाही तर ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात येते.