सतत रोखठोक मत मांडणाऱ्या रविचंद्रन अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमादरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर कामकाजाची अधिकृत भाषा आहे, असे वक्तव्य केल्यानंतर नव्या भाषावादाला तोंड फुटले आहे. पुन्हा एकदा चर्चेला उधा आले आहे.
तामीळनाडूतील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात अश्विनने आपल्या भाषणादरम्यान हे वक्तव्य केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविद्यालयातील समारंभामध्ये भाषणाला सुरुवात करण्याआधी अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले, भाषण कोणत्या भाषेत ऐकायला आवडेल? इंग्रजीला पसंती देणारे किती लोक आहेत त्यांनी हातवर करा, असा प्रश्न केला. त्यावेळी त्याला विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हिंदीमध्ये ऐकायला किती विद्यार्थी उत्सुक आहेत असे अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले. त्यालादेखील म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर हिंदी राष्ट्रभाषा नाही तर कामकाजाची अधिकृत भाषा आहे, असे अश्विन सहज बोलून गेला.
हिंदी भाषेसंदर्भातील या वक्तव्यावर सोशल मीडियावर चांगलेच वातावरण तापलेय. काही जण अश्विनने तथ्य मांडल्याचे सांगताहेत, तर काहीजण अश्विनने उगाच वादाला ठिणगी दिल्याचे मत व्यक्त केलेय.