>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्य, समर्पण आणि व्यावसायिकतेची जगभरात प्रशंसा झाली आहे. यूएनच्या शांतीरक्षा कार्यात सक्रिय सहभाग हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सीरियातील अशाच शांती कार्यात मोलाचे योगदान देऊन भारताचे नाव रोशन करणारे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या जागतिक शांतीरक्षा अभियानाचा थोडक्यात आढावा.
सीरियातील हिंसाचार जगाला रोज नवे हादरे देत आहे. गेल्या दीड वर्षापेक्षाही अधिक काळ तेथील शांतता प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी झटणारे भारताचे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे तिथे सेवा देत असताना गेल्या आठवडय़ात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ब्रिगेडियर अमिताभ झा हे एक भारतीय लष्करी अधिकारी होते, ज्यांनी सीरियातील गोलन हाइट्स येथे संयुक्त राष्ट्राच्या निर्सैनिकीकरण दलाचे (UNDOF) डेप्युटी फोर्स कमांडर म्हणून काम केले.
ब्रिगेडियर झा यांनी भारतीय लष्करात गोरखा रायफलचे अधिकारी म्हणून सेवा केली. भारतीय लष्करात खडतर परिस्थितीत सेवा दिलेल्या ब्रिगेडियर झा यांचा लष्करी मुत्सद्देगिरी, भूराजकीय प्रश्न, पारंपरिक युद्धनीती या विषयांचा सखोल अभ्यास होता. सियाचेन ग्लेशियर येथे काम करताना त्यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने आदर्श घालून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांनी पुढे विविध स्तरांवर नेतृत्वाची धुरा सांभाळली. ते एक अनुभवी आणि खंबीर नेते होते.
इस्रायल-सीरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत तेथील तणाव वाढला. सीरियातील बंडखोर गटांच्या वाढत्या हिंसाचारामुळे येथील परिस्थिती संवेदनशील झाली असून परिणामी शांतता दले आणि स्थानिक जनतेसाठी तेथील वातावरण अतिशय असुरक्षित ठरले आहे. सततचा बॉम्ब वर्षाव, प्रचंड प्रमाणात रक्तपात आणि अस्थिर वातावरणात काम करतानाही ब्रिगेडियर झा यांनी आपल्या जबाबदारीप्रति असलेल्या कटिबद्धतेचा कधीही विसर पडू दिला नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात युद्धबंदी कराराची अंमलबजावणी, मानवतावादी दृष्टिकोनातून सहाय्य, युद्धसदृश परिस्थितीत अडकून पडलेल्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे इत्यादी जबाबदाऱया सक्षमपणे पार पाडल्या. अतिशय गुंतागुंतीची नाजूक परिस्थिती असतानाही त्यांची कर्तव्याप्रतिची निष्ठा कायम राहिली. गोलान हाइट्स येथे नेमणूक होण्यापूर्वी ते डेमॉव्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टमंडळात लष्करी निरीक्षक म्हणून कार्यरत होते.
ब्रिगेडियर झा यांच्या नेतृत्वाखाली UNDOF ने गोलन हाइट्समध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इस्रायल आणि सीरियाच्या अधिकाऱयांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिक लोकसंख्येस मदत करण्यासाठी अनेक सामाजिक व मानवतावादी कार्य केले. ते एक खंबीर आणि अनुभवी नेते होते ज्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवले. एकंदरीत, ब्रिगेडियर अमिताभ झा यांनी गोलन हाइट्सवर संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली. ब्रिगेडियर अमिताभ झा यांना विविध खेळांतही रुची होती. ते अनेक सांघिक खेळ खेळत. पर्वतांमध्ये ट्रेकिंग करत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि मृत्यूची खात्रीच असलेल्या प्रदेशातही जागतिक शांततेसाठी प्रत्येक संकटाला नेटाने तोंड देण्याविषयीची त्यांची निष्ठा प्रेरणादायी आहे.
179 भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सेवा देताना आपले प्राण गमावले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र शांती सेना 1948 मध्ये लाँच केली गेली. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा अभियानात भारताचा एक गौरवशाली इतिहास आहे. भारत संयुक्त राष्ट्रांचा एक संस्थापक सदस्य आहे आणि तेव्हापासून जागतिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारतीय सैनिक केवळ लढाऊ भूमिकेतच नव्हे, तर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक सपोर्टमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भारतीय लष्कराच्या महिला तुकडय़ांनीही UN च्या अभियानात प्रशंसनीय काम केले आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षाः भारतीय सैनिकांनी जगभरातील संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये शांतता व स्थिरता प्रस्थापित करण्यात मोलाची मदत केली आहे.
मानवतावादी मदत ः भारतीय सैनिकांनी UN च्या आदेशानुसार मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे आणि युद्धग्रस्त लोकांना मदत पुरवली आहे. भारतीय सैनिकांनी स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी अनेक मानवतावादी कार्ये केली आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिरे, बांधकाम, पुनर्वसन कार्य आणि आपत्कालीन मदत यांचा समावेश आहे.
‘यूएन’च्या शांतीरक्षा कार्यात सक्रिय सहभागामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जबाबदार आणि शांतताप्रिय देश म्हणून प्रतिमा उंचावली आहे.
भारताला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील योगदानाचा समृद्ध वारसा आहे आणि तो शांतीरक्षकांचा सर्वात मोठा योगदानकर्ता आहे. त्यांनी आतापर्यंत अशा शांतता मोहिमांमध्ये सुमारे 2.75 लाख सैनिकांचे योगदान दिले आहे आणि आपली 5,900 सैनिक सध्या 12 संयुक्त राष्ट्र मोहिमांमध्ये तैनात आहेत. त्यामध्ये महिला कर्मचारी, अधिकारी, लष्करी निरीक्षकांचा समावेश आहे व ज्यात काँगोमधील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन फॉर स्टॅबिलायझेशन मिशन (MONUSCO) आणि युनायटेड नेशन्स इंटरिम मिशन इन अबेई यांचा समावेश आहे. 1950 मध्ये कोरियामध्ये त्यांच्या पहिल्या वचनबद्धतेपासून भारतीय सैनिकांनी त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी सार्वत्रिक प्रशंसा मिळवून शांतता मोहिमांची मागणी करत जटिल देखरेख केली आहे. अनेक भारतीय सैनिकांनी युनायटेड नेशन्स मिशनमध्ये शौर्य गाजवले आहे.