वेब न्यूज – निक वुजिसिस

>> स्पायडरमॅन

आपल्या आजूबाजूला सतत कुरबुर करणारी, लहान-सहान गोष्टींचा बाऊ करणारी, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमुळे हताश व निराश होणारी अनेक माणसे वावरत असतात. स्वतः नाउमेद असणारी ही माणसे त्यांच्या संगतीत येणाऱया लोकांवरदेखील नकारात्मक प्रभाव टाकत असतात. मात्र संकटाच्या महासागराला तोंड देणारी आणि आव्हानांच्या पर्वतासमोर खंबीरपणे उभी राहणारी माणसे दिसली की, आपल्यालादेखील एक प्रकारचे चैतन्य प्राप्त होते. या लोकांचा सहवास, त्यांनी संकटाशी दिलेली झुंज ही अनेकांसाठी एक प्रेरणा बनून जाते. 42 वर्षांचा निक वुजिसिस हा अशाच एका व्यक्तिमत्त्वात मोडतो. दोन्ही हात आणि पायांच्या शिवाय जन्माला आलेला निक आज जगभरातील व्यंग व अव्यंग अशा लाखो-करोडो लोकांचे स्फूर्तिस्थान बनलेला आहे.

आपल्या व्यंगावर धाडसीपणाने मात केलेला निक हा एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे, खेळाडू आहे आणि इंटरनॅशनल नॉन प्रॉफिट मिनिस्टरी, लाईफ विदाऊट लिम्ब्सचा अध्यक्षदेखील आहे. लेखक, चित्रकार आणि संगीतकार असलेला निक सामान्य माणसाप्रमाणे गोल्फ व फुटबॉल खेळतो. त्याचप्रमाणे त्याला सार्ंफग आणि फिशिंगमध्येदेखील रुची आहे. जगात सर्वात जास्त वाचल्या जाणाऱया लेखकांच्या यादीत निकचे नाव समाविष्ट आहे. त्याची आनंदाने आणि उत्साहाने जीवन जगण्याची शैली, त्याचे जीवनाविषयीचे विचार हे अनेकांना मार्गदर्शक ठरलेले आहेत. निकला ऑस्ट्रेलियाचा यंग सिटिझन पुरस्कारदेखील त्यासाठी मिळालेला आहे.

वयाच्या दहाव्या वर्षी निकने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या एका लेखाने त्याचे जीवन बदलून गेले. दिव्यांग असूनदेखील यशस्वी झालेल्या एका मुलाच्या आयुष्याची कथा त्या लेखात देण्यात आली होती. त्या लेखनाची प्रेरणा घेऊन निकने आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जगात फक्त आपण एकटेच अशा संकटाला तोंड देत नसून आपल्यासारखे अनेक जण अपंगत्वाचा सामना करत आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने आपल्या जीवनाला एक असे अद्भुत वळण दिले आहे की, आज त्याच्याकडे बघून अनेकांनी आपल्या निराशेवर मात केली आहे.