सामना अग्रलेख – तालिबान उलटला! आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण

अफगाणिस्तानात तालिबानींची राजवट आली तेव्हा पाकिस्तानने मोठाच जल्लोष केला होता; मात्र तोच तालिबान आता पाकिस्तानवर उलटला आहे. अफगाणसमर्थक तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या 16 आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण केल्याने केवळ पाकिस्तानचीच नव्हे, तर जागतिक सुरक्षा धोक्यात आली आहे. युरेनियम व आण्विक कर्मचारी म्हणजे तंत्रज्ञान व दारूगोळा अतिरेक्यांच्या ताब्यात असेल तर ही धडकी भरवणारी बातमी जगाची झोप उडवणारी आहे!

इस्लामी दहशतवादाला ‘जिहाद’चे नाव देऊन पाकिस्तानने ‘तालिबान’ नावाचा जो ब्रह्मराक्षस जन्माला घातला होता, तो ब्रह्मराक्षस आता संपूर्णपणे पाकिस्तानवरच उलटला आहे. मात्र अफगाण-पाक सीमेवरून आलेली ही ताजी बातमी केवळ पाकिस्तानच नव्हे, तर साऱ्या जगाने चिंता करावी अशी आहे. तेहरिक-ए-तालिबान (पाकिस्तान) या अफगाण समर्थक अतिरेकी संघटनेने गुरुवारी पाकिस्तानच्या 16 अणुशास्त्रज्ञ व कर्मचाऱयांचे अपहरण केल्याची बातमी आल्याने पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली. मात्र ते शास्त्रज्ञ नसून आण्विक कर्मचारी असल्याची सारवासारव नंतर पाकिस्तानकडून करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा या सीमावर्ती प्रांतात पाकिस्तानच्या अण्वस्त्र निर्मिती विभागाच्या खाणीला तालिबानी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. बंदुकांचा धाक दाखवून येथील अण्वस्त्र अभियंते व कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत घेतल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांचं वाहन पेटवून दिले. पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी प्रतिकार करण्याच्या आत तेहरिक-ए-तालिबानचे अतिरेकी पाकिस्तानी आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. अतिरेकी केवळ कथित वैज्ञानिक, अभियंते वा कर्मचाऱ्यांचे अपहरण करूनच थांबले नाहीत, तर अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचीही अतिरेक्यांनी लूट केली. युरेनियमचा साठा व आण्विक कर्मचारी तालिबानी अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्यामुळे भविष्यात अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट अणुबॉम्बची निर्मिती करू शकेल. ही भीती केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर साऱ्या जगाला भयचकित करणारी आहे. एका दहशतवादी संघटनेकडून दुसऱ्या दहशतवादी संघटनेकडे अणुबॉम्ब निर्मितीचे हे तंत्रज्ञान पोहोचले तर

संपूर्ण जगाचीच सुरक्षा

धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानी आण्विक अभियंते, कर्मचाऱ्यांचे तालिबानी अतिरेक्यांनी केलेले अपहरण ही पाकिस्तानपुरती मर्यादित घटना समजून आंतरराष्ट्रीय समुदायाला स्वस्थ बसता येणार नाही. अपहरणाच्या या घटनेनंतर 16 पैकी 8 अपहृतांना अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवल्याचा व पळवून नेलेले लोक अणुशास्त्रज्ञ नव्हे, तर सामान्य कर्मचारी आहेत, असा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. मात्र ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या अतिरेक्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यांची ओळखपत्रेच जाहीर करून पाकिस्तानी दाव्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत. पाकिस्तानच्या अणुऊर्जा आयोगात काम करणारे हे कर्मचारी असल्याचा पुरावाच तालिबानने समोर ठेवल्यानंतर पाकिस्तानी अण्वस्त्र निर्मितीच्या तकलादू सुरक्षा व्यवस्थेची पुरती पोलखोल झाली आहे. आण्विक कर्मचाऱ्यांच्या अपहरणामुळे पाकिस्तानची सुरक्षा तर धोक्यात आली आहेच; पण इस्लामी दहशतवादाचा सामना करणाऱ्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांना भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. युरेनियमचा वापर करून महासंहारक बॉम्बची निर्मिती करण्यासाठी अनेक अतिरेकी संघटना प्रयत्न करत असतानाच युरेनियमसह आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण व्हावे ही साधारण नव्हे, तर धडकी भरवणारीच घटना आहे. अफगाणिस्तानचे तालिबान सरकार व पाकिस्तान यांच्यात गेल्या चार वर्षांपासून

रक्तरंजित संघर्ष

सुरू आहे. दोन्ही देशांच्या सैन्याकडून रोजच एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. केवळ 2024 या एकाच वर्षात पाकिस्तानात 444 दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये पाकिस्तानचे 685 सैनिक मृत्युमुखी पडले. मागच्याच आठवड्यात पाकिस्ताननेही अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. यात महिला व मुलांसह 46 जण मरण पावले, असा आरोप तालिबान सरकारने केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानात सक्रिय असलेल्या ‘तेहरिक-ए-तालिबान’ या संघटनेने पाकिस्तानी लष्कराच्या प्रतिष्ठानांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. आण्विक कर्मचाऱयांचे अपहरण करून तालिबानी अतिरेक्यांनी ही धमकी खरी करून दाखवली. या घटनेनंतर अपहृत कर्मचाऱ्यांनी आमचे जीव वाचवा, असे साकडे पाकिस्तान सरकारला घातले आहे; तर आण्विक कर्मचाऱयांच्या बदल्यात पाकिस्तानने तेहरिक-ए-तालिबानविरुद्ध सुरू केलेली सैन्य कारवाई तत्काळ थांबवावी, अशी मागणी अतिरेक्यांनी केली आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानात तालिबानींची राजवट आली तेव्हा पाकिस्तानने मोठाच जल्लोष केला होता; मात्र तोच तालिबान आता पाकिस्तानवर उलटला आहे. अफगाणसमर्थक तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या 16 आण्विक कर्मचाऱ्यांचे अपहरण केल्याने केवळ पाकिस्तानचीच नव्हे, तर जागतिक सुरक्षा धोक्यात आली आहे. युरेनियम व आण्विक कर्मचारी म्हणजे तंत्रज्ञान व दारूगोळा अतिरेक्यांच्या ताब्यात असेल तर ही धडकी भरवणारी बातमी जगाची झोप उडवणारी आहे!