सोलापूरमध्ये कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या MSRL ऑईल इंडिया प्रा.लि सोलापूरच्या दोन्ही संचालकांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना एका व्यापाऱ्याने अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे वस्तू व सेवा कर बुडविल्याचे उघड झाले आहे. या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आले असून 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 35) आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 37) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही MSRL ऑईल इंडीया प्रा. लि. सोलापूर चे संचालक आहेत. यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 80.18 कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे 10.83 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन त्याद्वारे वस्तू व सेवा कर रुपातील महसूल बुडविला असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर दोघांनाही 08 जानेवारी 2025 रोजी, राज्य वस्तू व सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू व सेवा कर कायदा 2017 अंतर्गत अटक केली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी, सोलापूर यांनी आरोपींना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ही संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त रविंद्र गायकवाड यांनी सहायक राज्यकर आयुक्त तसेच राज्यकर निरीक्षक यांच्या पथकासह अपर राज्यकर आयुक्त किरण नदिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने, आजपर्यंत सदरील 12 व 13 व्या अटकेसह मोठ्या प्रकरणात अटक केल्या आहेत. यामुळे खोटया व बनावट कागदपत्रांच्या आधारे वस्तू व सेवा कराच्या करचोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असे, राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांनी ठणकावून सांगितले आहे.